पुणे : राजधानी दिल्लीमध्ये पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे ही बैठक काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीबाबत चर्चेसाठी होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर आज शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. दिल्लीतील बैठकीबाबत मोठा गैरसमज पसरवण्यात आला. ही बैठक केवळ राजकीय विषयांवर नाही, तर देशातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती, असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर देशात काँग्रेसशिवाय पर्यायी शक्ती उभी राहण अशक्य असल्याचंही पवार म्हणाले.
देशात काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचा पर्यायाची चाचपणी सुरु आहे का? असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावेळी बोलताना, आघाडी म्हणून आम्ही आत्ता बसलो नाही, पण पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर ती काँग्रेसला बरोबर घेऊनच करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. मी त्या बैठकीतही ते मांडलं. आघाडीचा चेहरा कोण असावं यावर सध्या आम्ही चर्चा केलेली नाही. पण मला वाटतं सामूहिक नेतृत्व हे सूत्र पुढं ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल, असं पवार म्हणाले.
सचिन वाझे याने केलेल्या आरोपांवरुन अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याच ठराव भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबत विचारलं असता, ठराव करुन चौकशीचे मागणी करण्याची (अजित पवार, अनिल परब) ही पहिलीच घटना आहे. चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ आहेत. यापूर्वी कधी झाल्या नाहीत त्या गोष्टी करण्यात त्यांचा लौकीक आहे, त्यांनी पुढाकार घेऊन असं काही केलं तर आश्चर्य नाही. चौकशी यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, त्यांचं स्वागत आमचे सर्व सहकारी करतील, अशा शब्दात पवारांनी भाजपच्या ठरावाची खिल्ली उडवली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांनी आपला स्वबळाचा नारा सुरुच ठेवला आहे. त्यावर बोलताना प्रत्येक पक्षाला संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. आमची काहीच तक्रार नाही, कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्यासाठी आम्ही सर्व बोलत असतो, काँग्रेसचाही तो अधिकार आहे, असं पवार म्हणाले.
टाटा रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका देण्याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या घडामोडींवरही पवारांनी भाष्य केलं. त्याबाबत पर्यायी व्यवस्था झाली आहे. त्याची काही अडचण नाही. टाटा हॉस्पिटल देशातील एक नंबरचे कॅन्सर रुग्णालय आहे. तिथेराज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. जितेंद्र आव्हाडांना तिथल्या डॉक्टरांनी नातेवाईकांच्या राहण्याबाबत प्रश्न मांडला होता. स्थानिक आमदारांनी तक्रार केल्याने मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. पण नंतर लगेचच दुसरीकडे जागा दिली, त्यामुळे प्रश्न सुटला असल्याचं पवार म्हणाले.