मोदींच्या नावाने आता मते मिळतील याची शाश्वती नाही; भाजप नेत्याचा घरचा आहेर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता ही दिवसागणिक वाढत आहे. देशामध्ये निवडणुकीदरम्यान अनेकदा मोदींचा चेहरा पाहून मत दिल्याचं म्हटलं जातं. मोदी लाट असल्याची चर्चा होते. २०१४ पासून हे होत आहे. मात्र याच दरम्यान आता केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी एक मोठं विधान केलं आहे. भाजपाला तिसऱ्यांदा हरियाणामध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. संघर्ष करावा लागणार आहे. एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून ते होऊ शकत नाही असं विधान केलं आहे. ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
राव इंद्रजित सिंह यांनी एकट्या मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नसल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आपल्यावर आणि राज्यावर आहे. पण त्यांच्या एकटयाच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नाही. मतदार मोदींच्या नावे मतं देतील असा आपला हेतू असू शकतो, पण हे सर्व तळागाळात काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. मतदान मत देतील हे त्यांच्यावरच अवलंबून आहे, असं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या २०१४ मधील मोठ्या विजयाचा उल्लेख करताना त्यांनी केंद्रात नरेंद्र मोदींमुळेच भाजपा सत्ता स्थापन करू शकली हे आम्हाला मान्य आहे. त्याचा राज्यांमध्येही फरक पडला. हरियाणातही पहिल्यांदा भाजपाने आपलं सरकार स्थापन केलं. दुसऱ्यांदाही भाजपाला यश मिळालं. पण अशावेळी शक्यतो दुसऱ्या पक्षाला संधी मिळते, असं म्हटलं आहे. राव इंद्रजित सिंह याचा बैठकीमधील एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
पहिल्यावेळी भाजपाला ९० पैकी ४७ जागा मिळाल्या, तर दुसऱ्यावेळी ४० जागा मिळाल्या असं सांगताना विजयी आकडेवारी कमी होत असते असं त्यांनी सांगितलं. पण या जागा आपण राखू शकतो का? याचा विचार करणं गरजेचं आहे असं राव इंद्रजित सिंह यांनी कार्यकर्ते आणि बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं आहे.