Top Newsमनोरंजन

राज्यात आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे, अम्युझमेंट पार्क सुरु

मुंबई : गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते. हे प्रतीक्षा आता संपली आहे. आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरु होणार आहेत. दरम्यान आजपासूनच अम्युझमेंट पार्कही खुली करण्यात येणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने काल शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजपासून म्हणजेच, २२ ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळुन खुली करण्यास परवानगी देण्यात येईल. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषित केले होते. यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती एसओपी तयार करणयाचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. टास्कफोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत चर्चा केली होती.

याआधीही कोरोना व्हायरसच्या साथीमुळेच सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अनिवार्य होते. निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे पालन करण्यासदेखील सांगितले होते. यंदा देखील अशाच पध्दतीची नियमावली सरकार जाहीरकरू शकते. कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगकर्मी, प्रेक्षक अशा सर्वांनाच या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

आता मेकअपदादांना कलाकारांना रंगवायची संधी मिळणार आहे, ध्वनीयोजना करणारादेखील नाट्यगृहात मोठा आवाज करेल, वेशभूषा करणारे दादा कलाकारांच्या कपड्यांची शोधाशोध करुन त्यांना व्यवस्थीत इस्त्री करुन ठेवतील, फलक रंगवणारे आता वेगवेगळ्या नाट्यगृहांच्या नावांचे फलक रंगवायला घेतील, कलाकार मंडळी संहिता शोधून त्यावर काम सुरु करतील, तर प्रेक्षकांना पहिल्या-दुसऱ्यालाटेनंतर तिसऱ्या घंटेचाच आवाज येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button