सार्वजनिक जीवनात वावरताना प्रामाणिक मुखवटे धारण करून कमालीचा अप्रमाणिकपणा करणार्या लोकांची गर्दी वाढलेली असताना एखादा माणूस तेवढ्याच नितळपणे आपल्यावर लोकांनी दिलेली जबाबदारी वाहताना बघितला की लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण होते. या आदराला पात्र ठरण्याची कसोटी पार झाली की अशी माणसे संतत्वाच्या पंगतीत लोक बसवतात हे लोकवैभव प्राप्त झाले होते शिवशंकर भाऊ पाटील यांना. आज आपल्यातल्या या संत वृत्तीच्या माणसाने जगाचा निरोप घेतला, मात्र मागे ठेवून गेला, सेवा, व्यवस्थापन, निरलसता आणि आरस्पानी व्यवहार. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात विखुरलेला भाविक एकदा त्याच्या दैवताचे नाव विसरेल, पण ज्याच्यामुळे सेवेच्या साध्या वेलाचा वटवृक्ष ज्याने करून दाखवला त्या कर्मयोगी भाऊंना कधीच विसरणार नाही.
धर्म, भक्ती आणि संस्थाने समाजाने असंख्य बघितली मात्र *धर्म, धार्मिकता अन् श्रद्धेच्या प्रांताचे सेवालयात रूपांतर करणारा किमयागार केवळ शिवशंकर भाऊ हा एकच माणूस होता हे उभ्या महाराष्ट्राला आता सांगायची गरज पडणार नाही. लोकांच्या श्रद्धेचा परतावा त्यांना वेगळ्या रूपात देण्याचे नियोजन अनेक गडगंज मंदिरात करता आले असते मात्र ते करू शकले नाहीत. या शिव शंकराने लोक समस्यांचे हलाहल पचवत लोकांच्या जीवनात भक्तीचा सुगंध निर्माण करण्याचा विडा उचलला आणि त्यात यशस्वी झाला.
शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून कुटुंब काळजीत होते. अशात गेल्या दोन दिवसात काही लोकांनी ते अत्यवस्थ असताना गेल्याची हूल उडवून दिली. पुन्हा काही तासाने भाऊ जिवंत असल्याचे समजले आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा कामना सुरू झाल्या. लाखो लोक या माणसावर घरच्या वडीलधार्या आधारसारखे प्रेम करीत होते. हळहळ, धाकधूक, चिंता आणि काळजी कालपासून उभ्या महाराष्ट्राला लागली होती.हे सहज घडत नाही, त्यासाठी कुण्यातरी ध्येयासाठी आयुष्य वाहावे लागते.
शिवशंकर भाऊंनी मंदिर व्यवस्थापन कसे करावे याचा जो वस्तुपाठ राज्याला घालून दिला तो येणारी हजार वर्षे तरी कुणी विसरणार नाही एवढी काटेकोरता त्यांनी स्वतःच्या जगण्यात भिनवून घेतली होती. मंदिर म्हटले की धनसंचय आलाच, मात्र लोकांच्या पैशाचा साठा कधी करायचा नाही हे तोट्याचे गणित या माणसाने मांडून याही क्षेत्रात धनाढ्य लोकांना लाजवेल असे व्यवस्थापन कौशल्य दाखवून दिले आहे. जे काम देशातल्या सर्वाधिक श्रीमंत असणार्या तिरुपती संस्थानला जमले नाही ते या कमी शिकलेल्या माणसाने करून दाखवले. लोकांमध्ये सेवा आणि समर्पण पैशाने नव्हे तर कृतीने टाकले जाऊ शकते याचे भाऊ मूर्तिमंत उदाहरण होते हे विसरून चालणार नाही. जे करायचे ते भव्य दिव्य हा ध्यास त्यांना लागला होता. शेगावमध्ये गेल्यावर जे काही भव्य नजरेपुढे पडते त्याच्या मागे या माणसाचे डोके होते हे यापुढे कुणाला सांगूनही पटणार नाही, पण हे सत्य आहे. देशातल्या कोणत्याही मंदिरात ज्या व्यवस्था सुरू होऊ शकल्या नाहीत, त्या सुरू करून यशस्वी चालवून दाखविण्याचे कौशल्य या माणसात होते. मान, सन्मान आणि पुरस्कार प्रत्येकाला प्रिय असतात, पण भाऊ त्यापासून चार हात लांब राहणारा कर्मयोगी ठरला त्याचे मोठे नवल राजकीय नेत्यांना वाटत होते. त्यात शरद पवार ही होते. पवार यांना व्यवसथापन क्षेत्रात संपूर्ण देश मानतो, पण ते शिवशंकर भाऊंना मानत होते यातच सगळे आले. लोकांनी उभारलेल्या सार्वजनिक संस्थांचा विश्वस्त कसा असावा हा प्रश्न येणार्या शंभर वर्षात कुणी विचारला तर त्याचे एकच उत्तर असेल ते म्हणजे शिवशंकर भाऊ पाटील. एखाद्या सोसायटीचा अध्यक्ष वर्ष दोन वर्षे लोकांच्या जिवाला घोर लावतो, पण इथे तर या माणसाने विश्वस्त पदाला सोन्याचे कोंदण स्वतःच्या वागण्याने बसवले, आता हे कोंदण निखळून पडले आहे.
शिवशंकर भाऊ यांचे जीवन अतिशय साधे असले तरी विचार आणि ध्येय मोठे आणि उच्च असल्याचा अनुभव आजवर राज्याने घेतला आहे.लोक शेगाव संस्थानवर येऊन गजानन महाराज बद्दल कमी अन तेथील व्यवस्थापन बद्दल तोंडभरून बोलतात,कागदाचा तुकडा सुद्धा नजरेस पडत नाही एवढी स्वच्छता लोकांना जी भावली त्यामागे या माणसाचे कठोर नियोजन होते, लोकांवर प्रगाढ विश्वास आणि जीवापाड लोकभावना जपण्याची ओढ या माणसाला संतत्वाच्या जवळ घेऊन गेली असे म्हटल्यास वावगे होणार नाही.