इतर

दुकाने आज उघडणार; सरकार विरुद्ध व्यापारी संघर्षाची चिन्हे

मुंबई : जीवनावश्क वस्तू वगळता अन्य दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा राज्य शासनाचा आदेश असला तरी राज्यातील व्यापारी उद्या, सोमवारी सर्व दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजने जाहीर केले आहे. भाजपने व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिल्यामुळे सरकार विरुद्ध व्यापारी असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

करोनाची साखळी तोडण्याकरिता राज्यातील जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. या विरोधात व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. ठिकठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यापाऱ्यांना पाठबळ दिले. शुक्रवारपासून सर्व दुकाने उघडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर सोमवारपर्यंत दुकाने उघडण्याचे व्यापाऱ्यांनी टाळले होते. टाळेबंदीबाबत सरकारचा अद्याप काही निर्णय झालेला नाही. राज्यात एक किं वा दोन आठवड्यांची टाळेबंदी लागू होऊ शकते. यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच अन्य वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून सोमवारपासून सकाळी १० ते सायंकळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवली जातील, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्टीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. करोनाचे संक्रमण रोखण्यासाठीच्या सर्व निकषांचे कडकपणे पालन करून आपले व्यापार सुरू करणार असल्याने जिल्हा प्रशासनाने राज्यात सर्वत्र व्यापाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले. मुखपट्टीशिवाय ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button