Top Newsशिक्षण

दहावीचा राज्याचा निकाल ९९.९५, तर कोकणचा निकाल १०० टक्के

पुणे : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात येईल. राज्याचा एकूण निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला.

कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले.

नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

विभागीय मंडळनिहाय निकाल

पुणे ९९.६५, नागपूर ९९.८४, औरंगाबाद ९९.९६, मुंबई ९९.९६, कोल्हापूर ९९.९२, अमरावती ९९.९८, नाशिक ९९.९६, लातूर ९९.९६, कोकण १०० टक्के.

परीक्षेसाठी बसलेले
विद्यार्थी : ९,०९,९३१
विद्यार्थिंनी : ७,४८,६९३
एकूण : १६,५८,६२४

निकाल पाहण्यासाठी लिंक : result.mh-ssc.ac.in
शाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in

निकालाची वैशिष्टये :

– एकूण १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण
– राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
– मुलांचा निकाल ९९.९४ टक्के,
– मुलींचा निकाल ९९.९६ टक्के
– १२,३८४ शाळांचा निकाल १०० टक्के
– ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
– दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के इतका लागला आहे
– मागील वर्षाच्या तुलनेत ४.६५ टक्के निकाल जास्त आहे

ना परीक्षा, ना टेन्शन, तरीही विद्यार्थी नापास

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे यंदा दहावीची परीक्षा झालीच नाही… त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं अजिबात टेन्शन नव्हतं…. मात्र तरीही काही विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत तर राज्यातल्या एकूण 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button