वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता; मुंबईत रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यामुळे मुंबईतील समुद्र किनाऱ्यालगतच्या भागातील परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून एनडीआरएफच्या पथकासह अग्निशमन दलाची यंत्रणा कार्यरत असल्याचे मुंबई महापौर किशोरी पडणेकर यांनी सांगितले आहे. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता जंबो कोविड सेंटरसह इतर परिसरातील आतापर्यंत ३८४ धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात आली आहे, यासह मुंबईत पाणी साचणाऱ्या किनारी वस्त्यांना सावधानतेचा इशारा देखील महापौरांनी दिला आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर २४ विभागीय नियंत्रण कक्ष सुविधांसह चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता देखील महापौरांनी वर्तवली असून रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश देखील दिले आहे. याशिवाय वरळी-वांद्रे सीलिंक आज आणि उद्या पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.