मुंबई : गोव्यातील काँग्रेस नेत्यांचे भाजपकडून फोन टॅप केले जात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी राऊत यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. भाजपने गोव्यात कुणाचेही फोन टॅप केले नाहीत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात, असं मनोहर आजगावकर यांनी म्हटलं आहे.
निवडणुका म्हटल्यावर असे आरोप होणारच. ज्यांच्यात खोट नाही, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही, असं आजगावकर यांनी म्हटलं आहे. आजगावकर हे कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राऊत यांचे आरोप फेटाळून लावले. तसेच काँग्रेसचे नेते दिंगबर कामत यांचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले. तसेच गोव्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार आहे. हे संपूर्ण बहुमताचं सरकार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मनोहर आजगावकर यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. आम्ही कोणावर डाव धरायचा, हल्ला करायचा असा विचार सुध्दा करत नाही. भाजपकडून कोणत्याही नेत्यांचे फोन टॅपिंग केले गेले नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यातही फोन टॅपिंग सुरू असल्याचा आरोप केला होता. ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी फोन टॅपिगंचा पॅटर्न राबवला जात आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भेटले होते. त्यांनीही त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची भीती व्यक्त केली होती. काल त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. मी त्यांना सांगितलं तुमचेच फोन टॅपिंग होत नाहीत तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे प्रमुख पक्षांचे नेते आहेत त्यांचेही फोन टॅप होत आहेत. फोन टॅपिंगचा कार्यक्रम उत्तम प्रकार सुरू आहे. गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे, अशी टीका करतानाच महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते, असा टोला राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला होता. आम्ही काळजी घेत आहोत. तसेच दिगंबर कामत यांच्यासोबत आम्ही आहोत, असं त्यांना सांगितल्याचंही राऊत म्हणाले होते.
फडणवीस असताना फोन टॅपिंगच्या, अधिकाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल: शरद पवारांचा इशारा
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप झाले होते. नुकताच त्यांच्या चौकशीचा अहवाल आला असून या प्रकरणी त्या दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या सत्तेसाठीच्या स्पर्धेची किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात बोलताना दिला.
देवेंद्र फडणवीसांच्या काळात राजकीय नेत्यांने फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयानं त्यांच्यावर २५ मार्चपर्यंत कठोर कारवाई करू नका, असा सूचना दिल्या आहेत. त्या काळात काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे राज्यपालांचे काम; राऊतांची खोचक टीका
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यानंतरही राज्यपालांनी काहीच निर्णय न घेतल्याने त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींवर जोरदार हल्ला चढवला आहे. कॅबिनेटमधील प्रमुख सदस्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखेविषयी कळवलं आहे. राज्यपालांना विधिमंडळाचं स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र सरकारचं महत्त्व कळत असेल तर त्यांनी ताबडतोब तारीख दिली पाहिजे, असं सांगतानाच राज्यपाल हे भापजचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांना लक्ष्य केलं. तसेच फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरूनही भाजपवर हल्ला चढवला.
राज्यपालांना पदावरून हटवलं पाहिजे, असं वाटतं का? असा सवाल संजय राऊत यांना केला असता, असं सरकारचं म्हणणं नसून महाराष्ट्राचं म्हणणं आहे. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत. हे या राज्यातील घटनात्मक पदावरील व्यक्तीला शोभणारं नाही, असा टोला त्यांनी लगावला. या देशात लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे हे मी वारंवार सांगतोय, अशा प्रकारच्या घटनात्मक संस्थांवर बसवलेल्या राजकीय लोकांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असा टोलाही त्यांनी राज्यपालांना नाव न घेता लगावला.
मुंबईत अजिबात दहशतवाद नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यापासून कोणतंही दहशतीचं वातावरण नाही. तुम्ही दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी या राज्यातील जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, असंही ते म्हणाले.
अधिवेशनात काम होत नाही. त्याला जबाबदार विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नावर आणि विकासावर कामकाज व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. पण विरोधी पक्ष ते होऊ देत नाही. काल मी मुख्यमंत्र्यांसोबत दीर्घ चर्चा केली. ठाकरे सरकारला काम करू द्यायचे नाही ही विरोधकांची भूमिका दिसतेय. याला लोकशाही आणि स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. ठिक आहे, जनता पाहत आहे, असंही ते त्यांनी सांगितलं.
फडणवीसांचे थेट उत्तर
संजय राऊतांच्या या आरोपांना उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याने माझं मनोरंजन होतंय, असा म्हटलं आहे. या आरोपात काही तथ्य नाही. राऊतांचे आरोप बिनबुडाच्या असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप झाले होते. नुकताच त्यांच्या चौकशीचा अहवाल आला असून या प्रकरणी त्या दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या सत्तेसाठीच्या स्पर्धेची किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा शरद पवार यांनी दिला. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट येताना दिसतोय.