‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ आज दुपारी महाराष्ट्रात पोहोचणार

मुंबई : ऑक्सिजन असलेली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणममधून गुरुवारी रात्री १ च्या सुमारास महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाली आहे. १०० टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे महाराष्ट्राला पुरवण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ही ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय. अशावेळी महाराष्ट्रासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली होती. त्यानंतर या एक्सप्रेसवरील ७ रिकाम्या टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरण्यात आला. त्यानंतर रात्री ही एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ही स्पेशल रेल्वे नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक टँकरमध्ये १५ ते २० टन लिक्विड ऑक्सिजन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकाच वेळी महाराष्ट्राला जवळपास १० टन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होणार आहे.
राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून खास ऑक्सिजन एक्सप्रेस देण्यात आली आहे. महाराष्ट्राला विशाखापट्टणम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.
नवी मुंबईच्या कळंबोली रेल्वे स्थानकातून १८ एप्रिलला रात्री ही ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला निघाली होती. पाच दिवसांनी ही ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होत आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा तुटवडा काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे. याने महाराष्ट्राला दिलासाही मिळणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र या ऑक्सिजन एक्स्प्रेसकडे डोळे लावून आहे.




