राज्यात दिवसभरात ४०,९५६ नवे रुग्ण, तर ७१,९६६ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज राज्यात ७१ हजार ९६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन ४० हजार ९५६ रुग्णांचे निदान झाले आहे. कालही राज्यात ३७ हजार ३२६ रुग्णांची नोंद झाली होती.
राज्यात आजपर्यंत एकूण ४५,४१,३९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५७ टक्के झाला आहे. तर राज्यात आज ७९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.४९ टक्के एवढा आहे.
मुंबईत १७१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहेत. मंगळवारी मुबंईत १७१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६०८२ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत ४१ हजार १०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ६ लाख २३ हजार ८० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर १७० वर गेला आहे.
नवी मुंबईत कोरोना संक्रमित होणाऱ्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. गेल्या महिन्यात दीड हजारपर्यंत पोहचलेली दिवसभरातील कोरोना रुग्णसंख्या आता थेट दीडशेच्या आत आली आहे. महानगर पालिका प्रशासनाने केलेले ट्रेसिंग, एपीएमसीवर लावलेले निर्बंध आणि लॉकडाऊन या सर्वांचा परिणामामुळे कोरोना संक्रमण कमी झाले आहे. आज नवी मुंबईतील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या गेल्या १० दिवसांत कमी होऊन ती फक्त १३२ वर आली आहे.



