देशातील कोरोना रुग्णसंख्येतही घट
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात अक्षरशः थैमान घातलं आहे. मागील आठवड्यापासून दररोज कोरोनाचे ३ लाखाहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. रविवारीदेखील साडेतीन लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अशात आता काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोमवारी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत किरकोळ घट नोंदवली गेली आहे. वर्ल्डोमीटरनुसार, देशात सोमवारी ३ लाख २० हजार ४३५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर २७६४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यानंतर भारतातील कोरोना रुग्णांची मृत्यूचा एकूण आकडा १ लाख ९७ हजार ८८० वर पोहोचला आहे. तर, देशात सध्या कोरोनाचे २८ लाख ८२ हजार ५१३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील नव्या रुग्णसंख्येतील ही घट महाराष्ट्रामुळेही आली आहे. राज्यात सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात दररोज ६० हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळत असतात. मात्र, सोमवारी ४८ हजार ७०० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.