जगातला सर्वात महागडा घटस्फोट ! दुबईच्या शासकाकडून सहाव्या पत्नीला मिळणार ५५ अब्ज डॉलर्स !
लंडन : दुबईचा शासक आणि संयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम याला त्याच्या सहाव्या पत्नीला म्हणजे प्रिन्सेस हाया हिला तब्बल ५५.२६ अब्ज डॉलर्स इतकी भलीमोठी रक्कम द्यावी लागणार आहे. लंडन कोर्टाने हा निर्णय सुनावला असून शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम याला त्याच्या १४ वर्षाच्या अल जलीला आणि ९ वर्षाच्या जायद या मुलांच्या भविष्यासाठी २९ कोटी डॉलर्सची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे.
शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुमची सहावी पत्नी असलेली प्रिन्सेस हाया ही २०१९ साली दुबई सोडून पळाली होती आणि तिने ब्रिटनमध्ये आश्रय घेतला होता. या दोघांचा हा घटस्फोट जगातल्या महागड्या घटस्फोटांपैकी एक असल्याचं सांगण्यात येतंय. लंडन हायकोर्टाने दिलेल्या आदेशात सांगितलं आहे की शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम याने तिच्या सहाव्या पत्नीला म्हणजे प्रिन्सेस हायाला २५ अब्ज डॉलर्स भरपाई द्यावी. तसेच त्यांच्या १४ वर्षाच्या अल जलीला आणि ९ वर्षाच्या जायद या मुलांच्या भविष्यासाठी २९ कोटी डॉलर्सची बँक गॅरंटी द्यावी. ही एकूण रक्कम ५५ अब्ज डॉलर्सच्या वर जाते.
पेगॅसस स्पायवेअरचा वापर करुन दुबईचा शासक आणि संयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम यांने त्याच्या सहाव्या पत्नीवर, प्रिन्सेस हाया हिच्यावर पाळत ठेवल्याचा ठपका लंडनच्या उच्च न्यायालयाने ठेवला होता. विशेष म्हणजे त्यांच्या दोन मुलांची मालकी कोणाकडे ठेवायची यासंबंधी न्यायालयात खटला सुरु असताना ही पाळत ठेवल्याचं स्पष्ट झालं होतं. दुबईचा शासक आणि संयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम याने त्याची आधीची पत्नी प्रिन्सेस हाया बिंत अल हुसेन आणि तिच्याशी संबंधित पाच लोकांवर पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली होती. शेख मोहम्मद हा ब्रिटनचा आखाती देशांमधील निकटवर्तीय आणि सर्वात चांगला मित्र असल्याचं समजतंय.