फोकस

ऐन दिवाळीत एसटीचा प्रवास १७.१७ टक्के महागला

मुंबई : इंधनाची झालेली दरवाढ आणि दुसरीकडे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता प्रवासासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहे. खासगी ट्रॅव्हल्सपाठोपाठ आता एसटी महामंडळानेही तिकीटांच्या दरात वाढ केली आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू होणार आहे.

इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान ५ रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.

गेल्या ३ वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळानं म्हटलं आहे.

नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसंच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत असून २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून व त्यानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकिट आकारणी केली जाणार आहे. तसंच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रक्कमेची आकारणी करतील, असं महामंडळानं स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button