
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून ठिकठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. तसेच संशयित हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यासाठी लाल किल्ला परिसरात शिपिंग कंटेनरची भिंत उभारण्यात आली आहे. या कंटेनच्या भिंतीवर महात्मा गांधी, सरदार पटेल, भगत सिंह आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमा रेखाटण्यात आल्या आहेत. तर कंटेनरच्या दुसऱ्या बाजूला तिरंग्याची प्रतिमा रंगवण्यात आली आहे.
Ahead of Independence Day 15th August, Delhi Police strengthen security near Red Fort-Chandni Chowk area, put blocks of large containers to barricade the area pic.twitter.com/fWSBnIGkLN
— ANI (@ANI) August 6, 2021
दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ला लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलनही सुरु आहे. त्यामुळे आंदोलनाची शक्यता पाहता कंटेनरची भिंत उभारण्यात आली आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांकडून ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. काही आंदोलनकर्ते लाल किल्ल्यावर पोहोचले होते. तसेच काही जणांनी लाल किल्ल्यावरील ध्वजस्तंभावर एक धार्मिक झेंडा फडकवला होता. तर काही दिवसांपूर्वी लाल किल्ल्याजवळ ड्रोन उडल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ ड्रोन जप्त केलं होतं. १ ऑगस्टला लाल किल्ल्याच्या मागील रोडवर एका वेब सीरिजचं शूटींग सुरु होतं. या शूटींगसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. १५ ऑगस्टला लाल किल्ल्याची जबाबदारी एनएसजी, एसपीजी, पॅरामिलिट्री फोर्सचे जवान आणि दिल्ली पोलिसांच्या हाती आहे. जवळपास ४० हजाराहून अधिक जवान सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.




