Top Newsराजकारण

मोदी सरकारने आता इंधन दराच्या शंभरीचाही उत्सव साजरा करावा; काँग्रेसची टीका

नवी दिल्ली: देशात कोरोनाची दुसरी लाट कायम आहे. अशातच भारताने शंभर कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. केंद्रातील मोदी सरकारने शंभर कोटींचे लसीकरण पूर्ण झाल्याचा टप्पा साजरा केला. दुसरीकडे इंधन दरांमध्येही मोठी वाढ झालेली आहे. यातच काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा साजरा केल्यानंतर आता इंधन दराच्या शंभरीचाही उत्सव साजरा करावा, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे.

भारतात लसीकरणाचा शंभर कोटींचा आकडा गाठल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारकडून मोठा गवगवा करण्यात आला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्यात सहभागी होत, ही देशासाठी उल्लेखनीय गोष्ट असल्याचे नमूद केले. यानंतर, विरोधकांनी मात्र मोदी सरकारच्या भूमिकेवरून निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा साजरा केला. त्यांनी इतरही शंभरी साजरी करून नवा आदर्श समोर ठेवायला हवा. काही आठवड्यांपूर्वीच पेट्रोलच्या किंमती प्रती लीटर १०० रुपयांच्या पुढे गेल्या आणि आता डिझेलच्या किंमतींनीही प्रती लीटर १०० रुपयांचा टप्पा गाठलाय. तसेच सेलिब्रेशनसाठी आणखी एक संधी आणि निमित्त आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या किंमती आता १००० रुपयांचा टप्पा ओलांडलाय, अशी खोचक टीका चिदंबरम यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button