Top Newsराजकारण

लखीमपूर घटनेने देशभर भाजपविरोधात संतापाची लाट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे रविवारी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तर प्रदेश आधीच भाजपसाठी आव्हान बनला आहे. चार महिन्यांनंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजकीय गणित बिघडू शकते. लखीमपूर घटनेवर देशभरातील विरोधी पक्षांकडून भाजपचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याची घटना घडली. त्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर लखीमपूर येथे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांच्या गाडीसह इतर गाड्यांची जाळपोळ केली. हिंसाचारामध्ये एक पत्रकार आणि चार शेतकऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर आता देशभर संतापाची लाट उसळताना पाहायला मिळत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आधीच नाराज होते. भाजप या घटनेनंतर बॅकफूटवर असून पक्षाच्या एका प्रमुख प्रवक्त्याने काहीही भाष्य करण्यास नकार देत म्हटले की, या प्रकरणी उत्तर प्रदेश शाखा बोलेल. राज्यातील भाजपच्या सह निवडणूक प्रभारी सरोज पांडे यांनी काँग्रेस आणि विशेषत: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. भाजप नेत्यांनी भलेही या घटनेवरून मौन धारण केले तरी सोशल मीडियात लखीमपूर घटनेवरून भाजप आणि विरोधी पक्षाचे समर्थक सोमवारी एकमेकांसमोर आले होते. प्रत्येक घटनेवर ट्विट करणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लखीमपूर घटनेवर काहीही ट्विट केले नाही.

हे रामराज्य आहे का किलिंग राज्य?

लखीमपूर प्रकरणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, फक्त हुकूमशाही कारभार येतो. ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. या घटनेवर टीका करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे राम राज्य आहे का किलिंग राज्य? असा सवाल त्यांनी केला.

शेतकऱ्यांना चिरडण्याची मोदींची पॉलिसी !

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना चिरडणे ही भाजप आणि पंतप्रधान मोदींची अधिकृत ‘पॉलिसी’ आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रातील भाजपचा एकही नेता या विषयावर बोलत नसताना महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही ठाकरे सरकारबद्दल कधी बोलणार, अशी विचारणा भाजपच्या राज्य प्रवक्त्याने संजय राऊत आणि नाना पटोले यांच्याकडे केली आहे

अनेक महिन्यांपासून नवीन कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भाजपकडून क्रूर थट्टा सध्या सुरू आहे. मात्र भाजप नेते राजकारण करण्यात आणि तालिबानी वृत्तीने आंदोलन चिरडण्यात मग्न असल्याची टीका होते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button