उदयनराजेंना गुंड म्हणणाऱ्या उद्योजकाला चोपले, काळे फासले, कपडेही फाडले !
इंदापूर : छत्रपची शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी उदयनराजेंना गुंड म्हणणाऱ्या एका उद्योजकाला काळं फासल्याची घटना इंदापुरात घडलीय. अशोक जिंदाल असं या उद्योजकाचं नाव आहे. इंदापूर एमआयडीसीमध्ये त्याची एक कंपनी आहे. या उद्योजकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो उदयनराजे भोसले यांचा उल्लेख गुंड असा करताना पाहायला मिळत आहे. त्यावरुन शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला काळ फासलं, त्याचे कपडे फाडले आणि त्यांची धिंडही काढली. त्यानंतर शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला पोलीस ठाण्यात घेऊन जात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
अशोक जिंदाल नावाच्या उद्योजकाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो उद्योजक उदयनराजे यांचा साताऱ्यातील एक गुंड असा उल्लेख करताना पाहायला मिळत आहे. यावरुन उदयनराजेंच्या समर्थकांनी इंदापुरातील या उद्योजकाला काळं फासलं, भर रस्त्यात त्याचे कपडे फाडले, तसंच त्या उद्योजकाची धिंड काढत त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. उदयनराजेंना गुंड संबोधल्यामुळे या उद्योजकावर गुन्हा दाखल करा अशी मागणीही त्यांच्या समर्थकांनी केलीय.