मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डसोबत कनेकशन होते. याचा खुलासा उद्या सकाळी १० वाजता मी करणार आहे, असे सांगतानाच फडणवीसांचा बॉम्ब नव्हे तर फुसका बार होता, उद्या मात्र फडणवीसांच्याच अंडरवर्ल्ड संबंधाचा हायड्रोजनचा बॉम्ब मी फोडणार आहे, अशा शब्दांत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे.
फडणवीसांनी घोषणा केली होती की दिवाळीनंतर फटाके फोडू, पण मला वाटतं फटाके भिजले आणि वाया गेले. नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र देवेंद्रजी १९९९ ला तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार म्हणून आलात. यापूर्वी मुंडे साहेबांनी अनेकांचे संबंध दाऊदशी जोडले. मात्र ६२ वर्षांच्या कार्यकाळात किंवा २६ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप कोणी सिद्ध करु शकले नाहीत. मी कवडीमोल दराने जमीन माफियाकडून घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांना चुकीची माहिती कोणीतरी देतोय.. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्र दिले असते. अंडरवर्ल्डचा खेळ जो सुरु केला आहे, आज मी बोलणार नाही, मात्र उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आणि मुख्यमंत्री असताना सर्व शहराला ओलीस ठेवलं होतं त्याचाा पर्दाफाश करणार, असं मलिक म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी राईचा पर्वत बनवला आहे. बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांना देण्यात आलेली माहिती चुकिची आहे. फडणवीस यांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं, चौकशीसाठी तयार आहे. कोणत्याही अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन विकत घेतलेली नाही. कवडीमोल किंमतीत जमीन कुठेही जमीन विकत घेतली नाही.
आम्ही दीड लाख फूट जमीन खरेदी केल्याचा फडणवीस यांनी आरोप केला. खोटे भाडेकरु ठेवल्याचा आरोप केला. त्या दीड लाख फूट जमिनीची पाहणी करा. त्या जागेवर शेख मदिनातुल्ल अमान हौसिंग सोसायटी आहे. १९८४ मध्ये इमारत बांधण्यात आली. ती मुनिरा पटेल यांनी रस्सीवाला यांना विकासाचे अधिकार देऊन १४० लोकांना घरं दिली. त्याच्या मागं जमीन आहे त्यावर झोपडी आहे. तिथं जमीन आहे तिथं सॉलिडस कंपनीकडं जमीन आहे. गेल्या ३० वर्षांपासून ती जमीन आमच्याकडे आहे. १९९६ मध्ये भाजप आणि शिवसेना पार्टीची सत्ता होती. 9 नोव्हेंबरमध्ये नवाब मलिक यांनी शिवसेना भाजपकडून पोटनिवडणूक विजयी झाले होते. त्याच गोवावाली बील्डिंगच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला होता. आम्ही भाडेकरु होते. मुनिरा पटेल यांनी आमच्याशी संपर्क करुन आमच्याकडे असलेल्या जागेचा पूर्ण ताबा घ्या असं म्हटलं. आम्ही मालकिणीकडून जमीन घेतली. सलीम पटेल याला मुनिरा पटेल यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी केल होतं. सरकारी दरानुसार आम्ही स्टॅम्प ड्युटी भरली होती. सरकारी कागदपत्रात त्याचा उल्लेख आहे.
फडणवीस यांनी वाढवून बॉम्ब स्फोटाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. सरदार वली खानचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीसांना माहिती देणाऱ्यांनी माहिती दिली नाही की सरदार वली खानचं घर आहे. सरदार वली खानचे वडील गोवावाला कम्पाऊंडमध्ये वॉचमनचं काम करतात.ज्यावेळी मुनिरा पटेल यांच्याकडून जमीन घेतली तेव्हा सरदार वली खाननं ३०० मीटरवर नाव चढवलं होतं. ते पैसे देऊन सरेंडर करण्याचं काम केलं. तिथं आमची दुकानं आहेत. गोवावाला बील्डिंगमधील संपत्ती त्यावेळी आमची होती. बिअर बार देखील तिथं होता, मुस्लीम समाजाच्या दबावामुळं आम्ही बिअर बार सरेडंर केला, असं नवाब मलिक म्हणाले. खान कुटुंब आणि पठाण कुंटुंबानं सातबाऱ्यावर नाव चढवलं होतं ते कमी कऱण्याचं काम केलं.
हायड्रोजन बॉम्ब फोडणार
देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टी वाढवून सांगण्याचा प्रयत्न केला. ६२ वर्षात कोणीही आरोप करु शकलं नाही. कोणत्याही यंत्रणेसमोर जायचंय ते जावा. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी जे करायचंय ते करा. सरकारी दप्तरात त्याची नोंद आहे. ‘झुठ बोलो जरा ढंग से बोलो’, असा टोला नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. देवेंद्र फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा मुद्दा पुढं आणलाय तर मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
मलिकांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे…
– कोणता आंतरराष्ट्रीय डॉन कुणासाठी देशात आला? याची माहिती उद्या देणार
– फडणवीसांच्या कार्यकाळात परदेशातून कसे व्यवहार होत होते याचा पर्दाफाश करणार
– फडणवासांनी आरोप केलेल्या जमीनीची खरेदी कायद्यानुसार झाली आहे.
– गोवावाला कंपाडऊडमध्ये अजूनही सरदार वली खान यांचं घर
– माझ्या जावायाच्या घरात गांजा सापडल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ते माफी मागत नाहीत. आशा आहे, ते माफी मागणार नाहीत. लढाई सुरुच राहिल. माझी मुलगी उद्या फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवेल.
– माझं अंडरवर्ल्डशी कनेक्शन नाही.
– उद्या सकाळी १० वाजता देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवलं होतं, त्याविषयी मी माहिती देईन.