कोल्हापूर : राज्यपालांचे वय झालंय आणि पवारांचे वय झालं नाही का? त्यामुळे शरद पवारांनी वयावर बोलू नये. राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही हे न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहे. परंतु ते निर्णय ठराविक काळातच घ्यावेत असा कुठेही कायदा नाही असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर खरमरीत टीका केली आहे.
राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या निवडीवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. हायकोर्टानं १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. त्यावरून भाजपाने पवारांना खरमरीत टोला लगावला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यात शरद पवारांवर निशाणा साधला. चंद्रकांतदादा म्हणाले की, शरद पवारांचे भाषण ऐकून मती गुंग झाल्यासारखं आहे. खोटं बोला पण रेटून बोला याची प्रचिती आज आली. माझं आव्हान आहे मंत्रालयात सगळ्या प्रमुख पक्षाच्या नेत्यांना बोलवा आणि काय खरं, खोटं एकदाच होऊन द्या. देवेंद्र फडणवीसांनी हायकोर्टात जे मराठा आरक्षण टिकवले ते सुप्रीम कोर्टात टिकवणं तुम्हाला का जमलं नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गावोगावी राष्ट्रवादी खोट्या सभा घेणार असेल तर त्यांच्यामागे आम्हीदेखील पोलखोल सभा घेत त्यांच्या खोटेपणाचा बुरखा फाडणार आहे. मराठा आरक्षण अंगावर शेकलं म्हणून शरद पवार आता पुढे येऊन खोटं बोलत आहेत. ५० टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही असं सांगता केंद्रात तुम्ही सत्तेत असताना झोपा काढत होता का? तुम्ही ज्या ज्या गावांत सभा घेणार म्हणता, खोटं सांगणार तिथे भाजपा तुमची पोलखोल करणारी सभा घेणार आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.