फॉर्म्युला ठरलेला नाही, मात्र उद्धव ठाकरेच ५ वर्षे मुख्यमंत्री : पटोले
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला होता. तसंच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं म्हणाले होते. इतकंच नाही तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. आता यासर्वांवर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं. पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. मात्र पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेला अकोल्यातील एक ढाबेवाला होता, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो म्हणाला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहेत. त्याला उत्तर देताना म्हणालो की त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री होणार ! शरद पवार यांनी आपले मत सांगितले, तसं मी माझ्या पक्षाचे मत सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा काँग्रेस स्वबळावर लढावे, ही जनभावना आहे. मी मन की बात सांगत नाही, नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.