मुंबई : भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेच्या (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय) पेंग्विन कक्षाच्या देखभालीचे कंत्राट यापूर्वीच वादात सापडले होते. मात्र नवीन संस्थेच्या नियुक्तीस विलंब होत असल्याने पालिका प्रशासनाने जुन्याच कंपनीला दीड महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे. या वाढीव कालावधीसाठी पालिका तब्बल ४५ लाख रुपये मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनाने मांडला आहे. मात्र खर्चाला आधीपासून सदस्यांचा विरोध असल्याने यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
राणीबागेच्या नूतनीकरणादरम्यान २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून हॅम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. यासाठी राणीबागेत पेंग्विन कक्ष तयार केला आहे. या पक्ष्यांचे व कक्षाची व्यवस्थापन प्रणाली महापालिकेकडे नसल्याने ११ सप्टेंबर २०१८ रोजी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीची ३६ महिन्यांकरिता नेमणूक केली होती. ही मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आली. यासाठी मागविलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नवीन कंपनीची निवड न केल्याने प्रशासनाने मुदत संपुष्टात आलेल्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला आणखी ४५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला. हा कालावधी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र अद्यापही नवीन कंपनी न मिळाल्याने स्थायीने २०१८ मध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावातील त्रुटींच्या आधारे मुदतवाढ दिली आहे.
बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; नितेश राणेंचा टोला
भाजपा नेते नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. “बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा” असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून टि्वट करत आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. “पेंग्विनची स्कॉटलंडवारी, उपाशीपोटी शेतकरी-कामकरी” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा आहे, मात्र येथे सामान्य जनता महाविकास आघाडी सरकारने दिलेली सजा भोगत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये एक व्यंगचित्र देखील शेअर केलं आहे. यामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती उभ्या असलेल्या दाखवण्यात आल्या आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. या व्यंगचित्रामध्ये हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत. नितेश राणे यांनी Penguin हा हॅशटॅग देखील वापरला आहे. याआधी देखील राणे यांनी अनेकदा आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.