राजकारण

पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत कोविडची लढाई जिंकण्याचा मुख्यमंत्र्यांना आत्मविश्वास

मुंबई : पंतप्रधानांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूत असा आत्मविश्वास व्यक्त केला. राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून रुग्णांस तात्काळ योग्य ते उपचार सुरु व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग फैलावलेल्या इतर राज्यांचेही मुख्यमंत्री होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत तसेच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे अशी ही माहितीही दिली.

महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडीसीवीरचा पुरेसा पुरवठा ही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा अशी मागणी करून मुख्यमंत्री म्हणाले की ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे.
रेमडीसीव्हीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असे मुख्यमंत्री म्हणाले.

रेमडीसीव्हीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी याबात योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही उद्योजक, कामगार तसेच इतरांशी सातत्याने बोलत असून तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. यात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढविण्याबरोबर, कामाच्या वेळा आणि पद्धतीत फरक करणे आवश्यक असल्याचे आपण सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button