पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीची शक्यता धूसर
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. कोरोनाचं संकट असल्यानं दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षपदासाठी आग्रही असलेल्या काँग्रेसला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. उद्यापासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. सरकारकडून कोविड परिस्थितीचं कारण देत निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ते रिक्त आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या आणि केवळ दोनच दिवस चालणाऱ्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षित होती. त्यासाठी संग्राम थोपटे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. या पदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची नावंही चर्चेत होती. मात्र काँग्रेस नेतृत्त्वानं थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं ते पद रिक्त झालं. पक्षाच्या प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानं पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं. तेव्हापासून रिक्त असलेलं पद यंदाच्या अधिवेशनात भरलं जावं अशी काँग्रेसची इच्छा आहे. मात्र ती पूर्ण होणं जवळपास अशक्य आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कोणताही प्रस्ताव सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना देण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.