Top Newsराजकारण

प्रचार रॅली, रोड शोवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी कायम; निवडणूक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली : आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात निवडणूक आयोगाने पुन्हा रॅली आणि रोड शोवर बंदी वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ३१ जानेवारीपर्यंत प्रचार रॅली, रोड शोवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तर डोअर टू डोअर कॅम्पेनसाठी १० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. याआधी डोअर टू डोअर कॅम्पेनसाठी ५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती.

पाच राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार ऑनलाईन करण्याचं आवाहन करताना निवडणूक आयोगानं महत्त्वाचे निर्देश दिले होते. रोडशो, प्रचारसभा, रॅली यावर बंदी घालण्यात आली होती. अखेर ही बंदी उठणार की नाही, याबाबत आज निर्णय करण्यात येणार होता. याकडे पाचही राज्यांच्या राजकीय उमेदवारांचं लक्ष लागलं होतं. अखेर निर्णय समोर आला असून कोणत्याही राजकीय पक्षांना या निर्णयातून अल्पसा दिलासा मिळाला आहे. कारण निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना प्रचार ऑफलाईन करता येणार नव्हता. अनेकांना ऑनलाईन प्रचारावरच भर द्यावा लागला होता. दरम्यान, जे नियम निवडणूक आयोगानं घालून दिले आहेत, त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबत काही नियमांत अल्पसा बदल करण्यात आला आहे. आज पाच निवडणूक राज्यांचे आरोग्य सचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार आता ३१ जानेवारीपर्यंत ऑफलाईन प्रचारावर बंदीच असणार आहेत.

दरम्यान, बंदीमध्ये वाढ करतानाही निवडणूक आयोगानं महत्त्वपूर्ण दिलासा राजकीय पक्षांना दिला आहे. राज्य निवडणूक आयोगानं २८ जानेवारी आणि १ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत प्रचारसभा घेण्यासाठी सूट दिली आहे. त्याचप्रमाणे दारोदारी जाऊन प्रचार करण्यासाठीही लोकांच्या सहभागाची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. डोअर टू डोअर प्रचारासाठी आता ५ ऐवजी १० लोक भाग घेऊ शकतात. याआधी पाच जणांना दारोदारी जाऊन प्रचार करण्यास मुभा होती.

दरम्यान, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना ३०० लोकांसह किंवा स्थळाच्या क्षमतेच्या ५० टक्के हॉलमध्ये सभा घेण्याची परवानगी दिली होती. देशात कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता निवडणूक आयोगाने ८ जानेवारी रोजी सर्व राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना १५ जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या रॅलींवर बंदी घातली होती आणि केवळ आभासी प्रचाराला परवानगी होती. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजकीय पक्षांची पदयात्रा, सायकल यात्रा किंवा रोड शो करण्यास बंदी घालण्यात आली होती.

या निर्बंधामध्ये राजकीय पक्षांना काही सवलती देण्यात आल्या आहेत. घरोघरी जात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात छोटे मेळावे घेण्यासही सूट दिली आहे. तर व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून डिजिटल प्रचार करण्यासाठी खुल्या मैदानात वाहन उभे करण्यास परवानगी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button