राजकारण

शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या भाजपला शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा अधिकार नाही; काँग्रेसची टीका

मुंबई : शेतकऱ्यांना कमी मदत दिल्याचा आरोप करत भाजपा महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात १ नोव्हेंबरला आंदोलन करत आहे परंतु भाजपाचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा हा बनावट व पोकळ आहे. निसर्ग चक्रीवादळाचा कोकण व गुजरातला फटका बसला असता पंतप्रधान मोदी यांनी फक्त गुजरातची हवाई पहाणी करून तात्काळ एक हजार कोटींची मदत दिली पण महाराष्ट्राकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर भाजपाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी दुजाभाव करणाऱ्या मोदींविरोधात बोंबा माराव्यात, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या आंदोलनाचा समाचार घेताना लोंढे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून दोन वर्ष वारंवार नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. मागील वर्षी आलेले अतिवृष्टीचे संकट असो वा, तौक्ते, निसर्ग, गुलाब चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असता महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मधील क्यार चक्रीवादळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ७३०९ कोटी रुपयांची मदत वाटप केले. तर यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असता नुकसानग्रस्त शेतक-यांना ५ हजार २२१ कोटींची मदत दिली. तर सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांना १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला. भाजपा सरकारच्या फसव्या कर्जमाफीसारखी ही कर्जमाफी दिली नाही. शेतकऱ्यांना रांगेत उभे करुन त्यांचा अपमान केला नाही. कोरोना काळात १० लाख लिटर दूध खरेदी करुन त्याची भूकटी केली पण केंद्र सरकारने भुकटी आयात दर पाडले. पीक विम्यासाठी शेतकरी व राज्य सरकारने पैसे भरले पण केंद्र सरकारने त्यांचा ९५० कोटी रुपयांचा हिस्सा भरला नाही त्यामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिला आहे.

नैसर्गिक संकटात केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करताना नेहमीच सापत्न भावाची वागणूक दिली. जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळावेळी राज्याने केंद्राकडे १०६५.५८ कोटी रुपयांची मदत मागितली असता केवळ २६८.५९ कोटी रुपये दिले. पूर्व विदर्भात ऑगस्ट २०२० मध्ये आलेल्या पूरस्थितीवेळी ९९९.६४ कोटी रुपये मागितले असता केवळ १५१.५३ कोटी रुपये राज्याला दिले, जून-ऑगस्ट-२०२० च्या अतिवृष्टी व पूराच्या नुकसान भरपाईसाठी ३७२१.२९ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला असता अद्याप एक दमडीही दिली नाही. तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी २०३.३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला परंतु अद्याप एक छदामही दिला नाही. केंद्रातील मोदी सरकारने राज्याला मदत दिली नाही त्याचा जाब मोदींना विचारण्याची हिम्मत राज्यातील भाजपा नेत्यांमध्ये नाही आणि उलट शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर एक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत असताना हे आंदोलन चिरडून टाकण्याचे पाप मोदी सरकारने केले. त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. या आंदोलनात ७०० च्या वर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला पण दिल्लीपासून अवघ्या काही मिनिटावर असलेल्या शेतकरी आंदोलनस्थळी जाण्यास पंतप्रधान मोदींना वेळ नाही. लखीमपूर खिरी यथे गरिब निष्पाप शेतकऱ्यांना भाजपाच्या मंत्रीपुत्राने गाडीखाली चिरडून मारले. अशा भारतीय जनता पक्षाला शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा काही अधिकार नाही. भाजपाचे हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे हे राज्यातील शेतकरी जाणतो, असेही लोंढे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button