मुंबई: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करता यावा, यासाठी खास अॅपचा वापर केला जाणार आहे. राज्य सरकारकडून तयार करण्यात येणाऱ्या या अॅपचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे अॅप येत्या दोन दिवसांत कार्यरत होईल. मुंबईतील ६५ रेल्वे स्थानकांवर या अॅपच्या माध्यमातून तिकीट-पाससाठी क्युआर कोड दिला जाईल. तर वॉर्ड स्तरावर ऑफलाईन सेवेच्या माध्यमातून तिकिटासाठी क्युआर कोड मिळवता येईल.
लोकल प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात येईल. हे एकप्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट असेल, या फोटो पासच्या आधारावरच तुम्हाला रेल्वेचा पास मिळेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. महत्त्वाचं म्हणजे जरी दुसरा डोस घेतला असला, तरी डोस घेऊन १४ दिवस झाल्यानंतरच ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. म्हणजे दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांची अट पूर्ण करावी लागणार आहे.
येत्या काळात शिथील झालेल्या निर्बंधाचा लाभ घेण्यासाठी हा फोटोपास आत्यावश्यक असेल. रेस्टॉरंट, जीम, मॉल अशाठिकाणी देखील अशा पासची गरज पडेल. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे गरजेचे असेल. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत मुंबईतील १८ वर्षावरील ९० लाख लोकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील, असा विश्वास आयुक्त इक्बाल चहल यांनी व्यक्त केला.