Top Newsराजकारण

ठाकरे सरकार म्हणजे ‘बाते कम, काम ज्यादा’ : नवाब मलिक

मुंबई: राज्यातील ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ठाकरे सरकारचा लेखाजोखा मांडला आहे. यावेळी बाते कम, काम ज्यादा, हेच आमच्या सरकारचं धोरण आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान, दोन वर्षानंतरही सरकार पाडता आलं नाही. त्यामुळे भाजप हतबल झालं आहे. आमदार खरेदीचा कार्यक्रम येथे करता आला नाही. त्यामुळे आता चंद्रकांत पाटलांना हटवायचं की देवेंद्र फडणवीसांना हटवायचं अशी चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये आता खदखद सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेकजण पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक असून लवकरच घरवापसीचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा लेखाजोखा मांडतानाच भाजपवर निशाणा साधला. दोन वर्षापूर्वी आघाडीचं सरकार स्थापन झालं. आजच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली. त्या दिवसापासून जनतेला न्याय देणं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचा दृष्टीकोण आम्ही ठेवला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मिती आपत्ती निर्माण झाल्यावरही आमच्या सरकारने यशस्वीपणे परिस्थिती हाताळली आहे, असं मलिक यांनी सांगितलं. मलिक यांनी भाजपवरही निशाणा साधला. विनोद तावडेंची तिकीट देवेंद्र फडणवीसांनी कापलं. पण आता तावडेंचं केंद्रात पुनर्वसन करण्यात आलं आहे. सध्या भाजपमध्ये खदखद सुरू आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपतून अनेक नेते येतील. पक्षातून गेलेल्यांचा घरवापसीचा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे, असं मोदींनी सांगितलं.

भाजप आता हतबल झालं आहे. दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही. आमदार खरेदीचा कार्यक्रमही इथे करता आला नाही. विरोधी पक्षाची गँग त्यात अयशस्वी झाली आहे. आता चंद्रकांत पाटलांना हटवायचंय की देवेंद्र फडणविसांना हटवायचंय? भाजप अंतर्गतच नव्या विरुद्ध जुने वाद निर्माण झाला होता. फ्रॉड लोकांना सोबत घेऊन फडणवीस राजकारण करत होते. ज्यांना फडणविसांनी साईडलाईन केलं होतं असे तावडें सारखे नेते आता केंद्रात मोठ्या पदावर गेले आहेत. यावरुन साईड लाईन केलेल्यांना पुन्हा पुढे आणायचं असं भाजपने ठरवल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व काय तो निर्णय घेईल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

आंतरराष्ट्रीय सीमा लवकरात लवकर बंद करा

यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या विषाणूवरही भाष्य केलं. अफ्रिकन स्ट्रेनला रोखायचं असेल तर आंतरराष्ट्रीय सीमा बंद करणं महत्वाचं आहे. पहिल्या वेळी उशीर झाला आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यावेळी आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे. नंतर कितीही उपाययोजना केल्या तरी व्हायरसला रोखणं मुश्कील होतं. केंद्र आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल ही अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

काम यूपीत अन् जाहिराती मुंबईत

आम्ही दोन वर्षात काहीच काम केलं नाही असं काही लोक म्हणत आहेत. पण या दोन वर्षात आम्ही काटकसरीचं धोरण स्वीकारलं. कोणत्याही कामाचा जास्त गाजावाजा करायचं नाही असं ठरवलं. जेव्हा काटकसरीचं धोरण स्वीकारतो तेव्हा कामगिरी कमी आणि गाजावाजा जास्त असं आम्ही करत नाही. उत्तर प्रदेशात छोटं काम होतं पण मुंबईतल्या वर्तमानपत्रात जाहिराती येतात. आमचं धोरण आहे, बाते कम, काम ज्यादा. इतरांचं धोरण काम करायचं नाही, केवळ प्रसिद्धी करायची. ते धोरण आमचं नाही, असं त्यांनी सांगितलं.

नियमित कर्ज भरणाऱ्यांचा विचार करू

या दोन वर्षात महत्त्वाचे निर्णय झाले. मागच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण तीन वर्ष त्यांना कर्जमाफी करता आली नाही. शेतकरी आंदोलन करत राहिले. त्यांना शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही. आमचं सरकार आलं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफी केली. दोन लाखाचं कर्ज घेणाऱ्यांना दोन महिन्याच्या आत कर्ज माफ केलं. २० हजार कोटीचं कर्ज माफ केलं. दोन लाखांवर ज्यांनी कर्ज घेतलं. त्यांना आश्वासन दिलं आहे. भविष्यात त्यांचा विचार करू. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांचाही विचार होणार आहे. कोविडमुळे आर्थिक ताण आला. पण आता त्यावरही निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button