मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुकानं, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स आदिंना कोरोना नियमातून सूट देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं बंदच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारनं घेतला आहे. मंदिराच्या मुद्द्यावरुन आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केल्यानंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मंदिरांबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.
मदिरालयांवर ज्यांचा विश्वास त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही. दारुवाल्यांना सूट देणारं, बार मालकांना सूट देणारं हे देशातील पहिलं राज्य सरकार आहे. हे जगातले एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, जे बीअर बार आणि दारुमालकांना सूट देतात. मेट्रोचं उद्धाटन चालतं, पुण्यातील कार्यालयाचं उद्घाटन चालतं, डान्सबार सुरु केले तरी यांना चालतं, त्यामुळे कोरोना होत नाही का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा केली तर कोरोना येतो असं राज्यातील थोर नेत्यांना वाटत असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केलीय.
जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आहे. जनतेचा आशीर्वाद भाजप-शिवसेनेवर होता. पण त्याविरोधात काम करणाऱ्यांना काय माहिती, असा टोलाही मुनगंटीवारांनी शिवसेनेला लगावलाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. लोकशाही मार्गानं त्यांना उत्तर देता येत नाही, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जोरदार टीक केलीय.