कोरोनाचा भयानक उद्रेक! २४ तासात ३५ हजारांवर नव्या रुग्णांची भर
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात ३५ हजार ९५२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १११ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर २.०७ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,००,८३३ (१३.७८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे २० हजार ४४४ कोरोनाचे रुग्ण गुरुवारी बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.७८ इतके आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करणे भाग पडले आहे. मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाही कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी राज्यात ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी हा आकडा आणखीच वाढला. मागील २४ तासांत राज्यात ३५ हजार ९५२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले.