मुंबई: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डाशी संलग्नित ट्रस्टसंदर्भातील कारवाई, भाजपच्या माजी मंत्र्याचा घोटाळा आणि कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य, एसटी कर्मचारी संप यामुद्यावर भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराच्या जागेचा घोटाळा केला असून लवकरचं ते प्रकरण पुराव्यानिशी बाहेर काढणार आहे, असं नवाब मलिक म्हणालेत.
क्लिन अप अंतर्गत मंदिर, मस्जिद आणि दर्गाहच्या जमीनी हडपल्या आहेत ते बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं जमिनी हडप केल्या आहेत. ईश्वराच्या नावावर, अल्लाहच्या नावावर दिलेल्या जमिनी हडप करण्यात आल्या. ती प्रकरणं बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं कसे शेकडो कोटी हडपले ते पुराव्यानिशी बाहेर काढणार आहे. जे अधिकारी या भ्रमात आहेत की नवाब मलिक घाबरू शकतात मी त्यांना सांगू शकतो की मी या प्रकरणाच्या शेवटापर्यंत जाणार आहे, असं मलिक म्हणाले.
वक्फ बोर्डच्या कार्यालयात छापे टाकण्याचं सांगण्यात आलं आहे. माझं ईडीच्या लोकांना आवाहन आहे की अफवा पसरवण्याचं काम बंद करावं. पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करुन भूमिका स्पष्ट करावी. सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवावी. काही बातम्या प्रसिद्ध करुन तुम्ही बदनामी करु शकत नाही. आपल्या वरिष्ठांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. पुण्यातील एंडोवमेंट ट्रस्टनं बनावट कागदपत्र दाखवत एमआयडीसीत जमीन घेतली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे. ईडीच्या एंन्ट्रीचं स्वागत आहे. वक्फ बोर्डात आम्ही क्लिनअप अभियान सुरु केलं, असं नवाब मलिक म्हणाले.
कंगनाचा पुरस्कार मागं घ्या
अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानाचा मलिक यांनी निषेध नोंदवला आहे. लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है, असं सांगतानाच कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. १८५७ पासून या देशात स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं. त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. गांधींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काही तरी बोलत आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री मागे घेतला जावा. या अभिनेत्रीने कोरोडो भारतवासियांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांना अटक करा, अशी मागणी मलिक यांनी केली.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा
यावेळी त्यांनी एसटी कामगारांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं. एसटी कामगार संप करत आहेत. त्यांच्या काही मागण्या आहेत. त्यावर तोडगा काढण्याचं काम संबंधित खात्याचे मंत्री करत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर लवकर तोडगा निघेल अशी आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.