
ठाणे : ईडीने राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. दुसरीकडे तत्कालीन एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे कोपरी पोलीस ठाण्यातून बाहेर पडले आहेत. वानखेडे यांची आज चौकशी झाली. यावर वानखेडे यांनी आज आपल्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. कागदपत्रे सादर केली आहेत. चौकशीला सहकार्य करत आहे. पुढेही बोलावले की सहकार्य करेन, असे सांगितले. तसेच नवाब मलिक यांना अटक झाल्याचे पत्रकारांनी विचारताच त्याबद्दल मला काही बोलायचे नाही असे म्हटले आणि कारमध्ये बसून निघून गेले.
नवी मुंबईतील सद्गुरू बार परवाना प्रकरणी ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी वानखेडे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठविली होती. यानुसार वानखेडे हे आज कोपरी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. सुमारे साडे सात तास त्यांची चौकशी सुरु होती.
दोन फेब्रुवारीला ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या मालकीच्या सद्गुरू बारचे लायसन रद्द केले होते. लायसन घेताना वानखेडे यांनी खोटे वय दाखविल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक रेस्ट्रो बार आहे. या रेस्ट्रो बारचे नाव सद्गुरू असून, उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला होता. या बारचे लायसन ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता.
कोपरी पोलिसांनी समीर वानखेडे यांचा ५ ते ६ पानी जबाब जबाब नोंदवला आहे. समीर वानखेडे यांनी पोलिसांना सहकार्य केले. जे काही प्रश्न विचारले त्यावर समीर वानखेडे यांनी उत्तरे दिली आहेत. आवश्यकता वाटली तर वानखडे यांना पुन्हा बोलावण्यात येईल. गुन्ह्याच्या तपासात जे काही सिद्धी होईल त्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे, असे कोपरी पोलिसांनी सांगितले.
क्रांती रेडकरांनी आवडतं गाणं केलं ट्विट !
ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरनेही ट्विट करुन मलिक यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
https://twitter.com/KrantiRedkar/status/1496341837661241344
समीर वानखेडे प्रकरणात मलिक यांनी सातत्याने वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी, समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनीही मीडियासमोर येऊन मलिक यांच्यावर टीका केली होती. आज, मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्याचे वृत्त माध्यमांत झळकल्यानंतर क्रांती रेडकर यांनी ट्विट करुन अप्रत्यक्षपणे मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
सा-रा-रा होलिका जले, शत्रू राख मे मिले,
हमने जबजब समशिरे तनी है, माय भवानी
सन-न-न-आंधिया उठे, शत्रू जड से मिठे
हमने बात यही मन में ठानी है माय ऐ भवानी
क्रांती यांनी तान्हाजी चित्रपटातील अजय देवगण आणि काजोल यांच्या गाण्यातील 28 सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला. तसेच, वन ऑफ माय फेव्हरेट साँग, जय माय भवानी… आप सब का दिन शुभ हो… असे ट्वि केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी २० फेब्रुवारी रोजी त्यांच्या अकाऊंटवरुन ट्विट केलं होतं. क्रांती यांच्या या ट्विटवर अनेकांनी ईडीच्या कारवाईशी संबंधित कमेंट केल्या आहेत. एकाने सत्यमेव जयते.. असेही म्हले आहे.