‘बिग बास्केट’नंतर टाटा खरेदी करणार ‘१एमजी’

मुंबई : टाटा सन्सच्या मालकीची टाटा डिजिटल लिमिटेडने ऑनलाईन हेल्थकेअर मार्केटप्लेस ‘१एमजी टेक्नॉलॉजिस लि.’मधील मोठा हिस्सा विकत घेणार आहे. टाटा डिजिटल लिमिटेडने गुरुवारी ही माहिती दिली आहे. कंपनीने हा व्यवहार कीर्तीचा झाला याची माहिती दिलेली नाही.
काही दिवसांपूर्वी कंपनीने म्हटले होते की, फिटनेस ब्रँड Curefit Healthcare मध्ये कंपनी ५५० कोटी रुपये गुंतविणार आहे. टाटा डिजिटल लिमिटेडने सांगितले की, ‘१एमजी’मधील गुंतवणूक एक डिजिटल इकोसिस्टीमच्या निर्मितीसाठी टाटा समुहाच्या स्वप्नांना साजेशी आहे. ई-फार्मसी, ई-डायग्नोस्टिक आणि टेली कन्सलटेशन इकोसिस्टीमच्या प्रमुख सेगमेंटमध्ये आहे. यामध्ये वेगाने वाढ होत आहे.
‘१एमजी’ची सुरुवात २०१५ मध्ये झाली होती. ही कंपनी देशातील प्रमुख ई-हेल्थ सेक्टर कंपन्यांमध्ये मोडते. ही कंपनी औषधे, आरोग्य आणि अन्य वेलनेस उत्पादनांची घरपोच सेवा आणि टेली कन्सल्टेशन सेवा उपलब्ध करते. क्युअरफिटचे संस्थापक सीईओ मुकेश बंसल हे टाटा डिजिटलमध्ये एक एक्झिक्युटीव्हच्या भूमिकेत असणार आहेत. याचबरोबर ते क्युअरफिटचे नेतृत्वही करणार आहेत. टाटा ग्रुपने ऑनलाईन ग्रॉसरी यूनिकॉर्न बिग बास्केट खरेदी केली आहे. गेल्याच महिन्यात ही मोठी डील झाली असून ६४ टक्के हिस्सेदारी टाटाने मिळविली आहे. बिग बास्केटमध्ये याआधी चीनच्या अलिबाबा समूह आणि एक्टिस एलएलपीचा मोठा हिस्सा होता. मात्र आता ते यातून बाहेर पडले आहेत. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगानं (सीसीआय) गेल्याच महिन्यात या कराराला मंजुरी दिली.