दुबई : यूएईमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. उपांत्य फेरीत पोहोचलेले चार संघ आता मिळाले आहेत आणि सामन्यांचं वेळापत्रकही समोर आलं आहे. पाकिस्ताननं आज स्कॉटलंडचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. खरंतर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीसाठी याआधीच पात्र ठरला होता. पण आजच्या सामन्यानंतर गुणतालिकेतील स्थान निश्चित होऊन उपांत्य फेरीत नेमकी कोणत्या संघाची कुणासोबत लढत होणार हे निश्चित झालं आहे.
आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी (संध्याकाळी ७.३० वाजता) अबूधाबीच्या स्टेडियममध्ये रंगणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लढत होईल. तर उपांत्य फेरीचा दुसरा सामना गुरुवारी ११ नोव्हेंबर रोजी (संध्याकाळी ७.३० वाजता) दुबईच्या स्टेडियमवर होणार असून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.