![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/07/india.jpg)
कोलंबो : भारताच्या यंग ब्रिगेडनं टी-ट्वेंटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या या अखेरच्या मालिकेत सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधण्यास उत्सुक आहेत. पृथ्वी शॉचे पदार्पण निराशाजनक ठरले, त्याला पहिल्याच चेंडूवर माघारी परतावे लागले. पण, सूर्यकुमार यादव, शिखर धवन आणि संजू सॅमसन यांनी संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानंतर गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावताना विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेची ५ वी विकेट १११ धावांवर पडली अन् पुढील १५ धावांत संपूर्ण संघ माघारी परतला.
पहिल्या चेंडूवर विकेट पडूनही भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ केला. कर्णधार शिखर धवन, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी चांगली फटकेबाजी केली. हार्दिक पांड्याकडून अखेरच्या षटकांत टोलेबाजी खेळी पाहण्याची अपेक्षा होती, परंतु त्याचा बॅट अन् बॉलशी संपर्कच होत नव्हता. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हार्दिकचे अपयश हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही टिच्चून मारा केला. पृथ्वी शॉ याला टी-ट्वेंटीतील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर माघारी जावे लागले. दुष्मंथा चमिरानं टाकलेला पहिलाच चेंडू इतक्या जलदगतीनं वळला की पृथ्वीला काही समजण्यापूर्वीच चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात झेपावला होता.
संजू सॅमसन २० चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह २७ धावांवर बाद झाला. शिखर धवन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केले. धवनने ३६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४६ धावा केल्या. सूर्यकुमारनं ३४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारासह ५० धावा केल्या. हार्दिक पांड्याला १०10 धावा करता आल्या. इशान किशननं (२०*) चांगला खेळ करताना संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. टीम इंडियानं ५ बाद १६४ धावा केल्या.
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेला तिसऱ्या षटकातच धक्का बसला. कृणाल पांड्यानं सलामीवीर मिनोद भानुकाला (१०) सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद करून बाद केले. त्यानंतर युजवेंद्र चहल व भुवनेश्वर कुमार यांनी अनुक्रमे धनंजया डी सिल्व्हा (९) व अविष्का फर्नांडो (२६) यांच्या विकेट घेतल्या. चरिथा असलंका व आशेन बंदारा यांनी चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी करत टीम इंडियाला बॅक फूटवर पाठवले. तेराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं स्लोव्हर चेंडू टाकून बंदारा (०९) याचा त्रिफळा उडवला. असलंका दुसऱ्या बाजूनं आक्रमक पवित्र्यातच होता. युजवेंद्र चहलनं उत्तम गोलंदाजी करताना ४ षटकांत १९ धावा देत १ विकेट घेतली.
सोळाव्या षटकात दीपक चहरनं श्रीलंकेला मोठा धक्का दिला. २६ चेंडूंत ३ चौकार व तितकेच षटकार खेचून ४४ धावा करणाऱ्या असलंकाला त्यानं पृथ्वी शॉकरवी झेलबाद केले. हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. असलंका बाद झाला तेव्हा श्रीलंकेला २७ चेंडूंत ५४ धावा हव्या होत्या. त्याच षटकात दीपकनं आणखी एक विकेट घेत, टीम इंडियाचा विजय पक्का केला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार व वरुण चक्रवर्थी यांनीही विकेट घेत यजमानांवरील दडपण अधिक वाढवलं. श्रीलंकेला १० बाद १२६ धावा करता आल्या. भारतानं हा सामना ३८ धावांनी जिंकला. दीपकनं दोन, तर भुवीनं २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या.