रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती; दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित
जालना : जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद इथल्या जनसंपर्क कार्यालयाची कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय झाडाझडती केल्याप्रकरणी दोन फौजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरुन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही कारवाई केली.
पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्तमराव तिडके आणि पोलीस कॉन्स्टेबल शाबान जलाल तडवी अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. ११ जून रोजी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणती कायदेशीर परवानगी न घेता जालना जिल्ह्यातील जाफराबाद इथल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यलयाची तपासणी केली, असा आरोप आहे. यावेळी या पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसंच कामकाजाच्या संचिका देखील सोबत नेल्या, अशी तक्रार रावसाहेब दानवे यांनी केली होती. या प्रकरणी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशी करुन दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जणांचं निलंबन केलं.
ही तपासणी करुन नेमकं काय निष्पन्न झालं याचा खुलासा रावसाहेब दानवे यांनी मागितला होता. या प्रकरणी चौकशी करुन पोलिसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी ही कारवाई केली.