Top Newsफोकस

मुंबईसह उपनगरात सकाळपासून दमदार पाऊस

मुंबई : मुंबईसह उपगनगरात आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. दिलासादायक बाब म्हणजे लोकल सेवा सुरळीत आहे. हार्बर, टान्सहार्बर आणि पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक सुरु आहे. लालबाग, परळ, भायखळा, माझगाव दादर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
सायन परिसरातील गांधी मार्केटमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हा सखल भाग असल्याने थोड्या पावसातही इथे पाणी साचलं. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसातही हा परिसर जलमय झाला होता. परिणामी वाहनांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तशीच परिस्थिती आजही निर्माण झाली आहे.

पुढील तीन तास मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तर संध्याकाळपर्यंत मध्यम स्वरुपाचाच पाऊस असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र मुंबईत संध्याकाळपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.

पूर्व, मध्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण पश्चिमेकडून आलेला मान्सून हा येत्या काही दिवसांमध्ये आणखी तीव्र स्वरुप धारण करु शकतो अशी शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. देशातील पूर्व आणि मध्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपात पाऊस बसरणार असल्याचा अंदाज वर्तवत पुढच्या काही दिवसांसाठी असं चित्र कायम असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

दक्षिण पश्चिम मान्सून आता अरबी समुद्र आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागांत अधिक सक्रिय होताना दिसणार आहे. याशिवाय गुजरातचा काही भाग आणि उर्वरित तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि संपूर्ण ओडिशा तसंच पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि बिहारचा पूर्ण भाग येत्या २-३ दिवसांत व्यापणार आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये येत्या दिवसांत मान्सूनचे अधिकाधिक परिणाम दिसून येतील. १५ जूनपर्यंत महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देत हवामान खात्यानं नागरिकांना सतर्क केलं आहे. १२ ते १५ जूनदरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टी आणि बहुतांश कोकणात अतीमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आयएमडीकडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button