आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू
लखनऊ : प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे.
नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची बातमी येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच पोलीस महासंचालक के पी सिंह तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनीदेखील नरेंद्र गिरी यांचा मृतदेह ज्या ठिकाणी फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला त्या ठिकाणाची पाहणी केली. मिळालेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह एका पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. तसेच ज्या घरात गिरी यांचा मृतदेह लटकलेला होता, त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते. पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असू शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र गिरी महाराज मागील अनेक दिवसांपासून मानसिक तणावतून जात होते. रविवारी गिरी यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची भेट घेतली होती. मागील अनेक दिवसांपासून गिरी यांचा त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी वाद सुरु होता. नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांना त्यांच्या आश्रमातून बाहेर काढलं होतं. हा वाद संपल्यानंतर आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांची माफी मागितली होती.
देव हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो :अखिलेश यादव
अखिल भारतीय अखाड़ा परिषद के अध्यक्ष पूज्य नरेंद्र गिरी जी का निधन, अपूरणीय क्षति!
ईश्वर पुण्य आत्मा को अपने श्री चरणों में स्थान व उनके अनुयायियों को यह दुख सहने की शक्ति प्रदान करें।
भावभीनी श्रद्धांजलि। pic.twitter.com/wD2JC14LDp
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 20, 2021
महंत नरेंद्र गिरी यांचे निधन झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी देव हे दु:ख पचवण्याची शक्ती प्रदान करो, असे म्हटलं आहे. तसेच गिरी यांचे निधन ही आमच्यासाठी मोठी हानी आहे. गिरी यांच्या आत्म्याला शांती मिळो, असेही यादव म्हणाले आहेत.