अहमदनगर : केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुरत-नाशिक-नगर-सोलापूर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेची घोषणा केली. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज ४ हजार ७५ कोटींच्या २५ महामार्गाचे भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. रोहित पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते.
या एक्सप्रेस वेच्या माध्यमातून राज्यातील ट्राफिक पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा गडकरी यांनी केला. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात हा एक्सप्रेस वे एक मैलाचा दगड ठरणार असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. या रस्त्याला पूर्ण ग्रीन अलाईन्मेंट आहे. हा रस्ता सूरत ते चेन्नई पर्यंत जाणार आहे. यात पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर, दिल्ली, राजस्थान, गुजरात इथला सगळा ट्राफिक येतो मुंबईत. मुंबईवरुन सोलापूर, कोल्हापूरवरुन तो दक्षिणेत जातो. त्यामुळे कोल्हापूरचंही ट्राफिक जाम कमी होईल, सोलापूरचाही कमी होईल आणि हा सगळा सूरतवरुन वळेल, असं गडकरी म्हणाले.
हा रस्ता हा अॅक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे असणार आहे. परवा मी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेवर होतो. त्यावर मी जेव्हा ट्रायल घेतली तेव्हा गाडी १४० किमी प्रतितास गाडी चालली. नंतर १७० किमी प्रति तास वेगाने गाडी चालली तेव्हा पोटातलं पाणीही हललं नाही. आपल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पेक्षा रुंदीला तीन पट मोठा आहे. आता ७० टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे सगळी वाहतूक आता सूरतवरुन वळेल, असं गडकरी म्हणाले.
आता इथेनॉल निर्मितीची गरज
राज्यात आता इथेनॉल निर्माण केलं पाहिजे. तसंच, राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी पेट्रोल पंप सुरु करावा, असं आवाहन केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. केंद्राने शुगर केन ज्यूसपासून इथेनॉल निर्माण करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे इथेनॉल निर्माण केलं पाहिजे, असं गडकरी यावेळी म्हणाले.
यावेळी गडकरी यांनी महाराष्ट्रात आता इथेनॉल निर्माण केलं पाहिजे, शुगर केन ज्यूसपासून इथेनॉल निर्माण करायला परवानगी दिली आहे. ४ हजार ५०० कोटी लिटर इथेनॉल निर्माण झाला, जेवढं इथेनॉल निर्माण होईल ते भारत सरकार विकत घेईल. इथेनॉल इंधन हे पेट्रोल पेक्षा चांगलं आहे. बाहेर देशात अमेरिका, ब्राझील आणि कॅनडामध्ये इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर गाड्या चालत आहेत. माझा आग्रह आहे ट्रान्सपोर्ट शंभर टक्के इथेनॉल झालं पाहिजे. बजाज आणि टिव्हिएसने इथेनॉल स्कुटर तयार केल्या आहेत, नितीन गडकरी म्हणाले.
बारा लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो, पण आपला शेतकरी इथेनॉल निर्माण करू शकतो, इथेनॉल पंपाना परवानगी मिळाली आहे. मी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. युरो ४ चे नॉर्म आहेत. त्यावर इथेनॉल वापरले तर शंभर टक्के प्रदूषण कमी होऊ शकते. फ्लेक्स इंजिन निर्माण झालं की सगळं इथेनॉलवर सुरू होईल. मी नागपुरात ३५ बसेस इथेनॉलवर चालवल्या आहेत. ब्राझील मध्ये इथेनॉल वर आहेत, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी इथेनॉल इंधन निर्माण करतील आणि १२ लाख कोटी पैकी ५ लाख कोटी शेतकऱ्यांच्या घरात गेले तर कशाला शेतकरी गरीब राहील, असं गडकरी म्हणाले.
फक्त साखर ही मानसिकता बदलावी लागेल : शरद पवार
गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात बीड, उस्मानाबाद, औरंगाबादमध्ये हजारो एकराचे पीक उद्धवस्त झाले आहे. शेतकऱ्यांची भावना आहे की आधार देणारे पीक कोणते असेल तर ऊसाचे पीक असेल. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे भूगर्भाच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी कमीत कमी दोन वर्षे भूगर्भातील पाण्याची चिंता नाही. पण शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक घेण्याची प्रवृत्ती सोडायला हवी. यापुढच्या काळात साखरेवर अवलंबून राहता येणार नाही. तसेच ऊसाच्या पिकावरही अवलंबून राहता येणार नाही. साखर एके साखर कमी करावे लागेल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. यापुढच्या काळात इथेनॉलच्या तसेच हायड्रोजनच्या पर्यायाकडे बघण्याची गरज असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
ऊसाला पर्याय म्हणून इथेनॉलच्या पर्यायाकडे पहावे लागणार आहे. इथेनॉलबाबत केंद्राचे अंतिम धोरण ठरेल. त्याचा परिणाम म्हणजे साखर एके साखर हे धोरण कमी करावे लागेल. साखरेला म्हणजे ऊसाच्या पिकाला मर्यादा आहेत. पण इथेनॉलला मर्यादा येऊ शकत नाही. त्यामुळे आगामी कालावधीत शेतकऱ्यांसाठी योग्य योजना मांडणे, योग्य मानसिकता तयार करणे गरजेचे असणार आहे.
काही दिवसांपूर्वी नॉर्वे येथील लोक मला भेटायला आले होते. इथेनॉलच्या पुढे जाऊन हायड्रोजन गॅस पुढची स्टेप त्यांनी सांगितले. हायड्रोजनच्या माध्यमातून दळणवळणाची साधने, पर्यावरणासाठी अनुकुल अशा हायड्रोजनचा वापर कसा करता येईल यासाठीच्या नव्या कल्पना त्यांनी सुचवल्या. जगातील देश आता हायड्रोजनचा अभ्यास करत आहेत. म्हणून आपल्याकडेही हे नवीन बदल आणि योजना योग्य पद्धतीने मांडणे आणि मानसिकता तयार करणे गरजेचा आहे. यासाठी गडकरींचा पुढाकार महत्वाचा आहे. नगर जिल्हाही ऊसासाठी महत्वाचा जिल्हा आहे. नगर जिल्ह्यांमध्ये एकंदर विकासाच्या दृष्टीने ज्या मागण्या होत्या त्या गडकरींनी पूर्ण केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
===========