चंढीगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे. आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली. माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनीही पंजाबचेमुख्यमंत्रीपद स्विकारण्यास स्पष्टच नकार दिला. त्यानंतर, सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव निश्चित करण्यात आले असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल.
अंबिका सोनी यांना सोनिया गांधींनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण, अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे. तसेच, पंजाबचा मुख्यमंत्री हा शीख व्यक्ती असला पाहिजे, असे माझे मत आहे. मी गेल्या ५० वर्षांपासून हेच म्हणते आहे. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाला नकार दिला असून आज संध्याकाळपर्यंत नाव निश्चित होईल, असेही अंबिका सोनी यांनी म्हटलं. त्यानंतर, सोनी यांच्या म्हणण्यानुसार शीख व्यक्तीलाच पसंती देण्यात आली आहे. त्यानुसार, सुखजिंदर सिंग यांचे नाव हायकमांडकडे देण्यात आलं आहे. येथील आमदारांनी हेच नावे पुढे केले. त्यामुळे, काँग्रेसचे सरचिटणीस आणि निरीक्षकांनीही हेच नाव पक्षश्रेष्ठींसमोर ठेवले आहे.
मुख्यमंत्रीपदासोबतच येथे दोन उपमुख्यमंत्री पदे देण्यात येणार आहेत. जातीय आणि श्रेत्रीय समीकरण साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. अरुण चौधरी आणि भारत भूषण आशू यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. अरमिंदर सिंग यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेल्या सुखजिंदर सिंग यांनी, आपणास कुठल्याही पदाची अपेक्षा नसल्याचे म्हटले होते. आम्ही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलत आहोत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, तुम्ही काँग्रेस कार्यकर्त्याशी बोलत आहात असे उत्तर रंधावा यांनी दिले होते.
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस आणि निरीक्षकांनी चंडीगडमध्ये जाऊन तेथील आमदारांची मतं जाणून घेतली आहेत. तर, मला विश्वास आहे की, पंजाबचा मुख्यमंत्री हा शीख व्यक्तीच असेल, असे अंबिका सोनी यांनी अगोदरच स्पष्ट केले होते.