राजकारण

इक्बाल मिर्चीच्या कंपनीकडून भाजपने घेतली देणगी; अनिल गोटे करणार ईडीकडे तक्रार

मुंबई : १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपने देणगी घेतला असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. याबाबत अनिल गोटे आज ईडीकडे तक्रार दाखल करणार आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तेचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. मलिक सध्या मनी लाँड्रिंगच्या आरोपात ईडीच्या कोठडीत आहेत.

राज्याचे विधीमंडळ अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष भाजपकडून नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड संबंधाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. आता, भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून भाजप आणि इक्बाल मिर्चीच्या संबंधाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

अनिल गोटे यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर सन २०१४-१५ मध्ये इक्बाल मिर्चीशी संबंधित असलेल्या कंपनीकडून भाजपला १० कोटींची देणगी मिळाली होती. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला आणि १९९३ च्या मुंबई बाॅम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित असलेल्या आरकेडब्लू डेव्हलपर्स प्रा. लि. म्हणजेच पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी व सध्या तुरुंगात असलेल्या राकेश वाधवान याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बॅंक खात्यातून ही देणगी देण्यात आल्याचा आरोप गोटे यांनी केला.

भाजपला मिळालेल्या या देणगीची तक्रार अनिल गोटे ईडीकडे करणार आहेत. अनिल गोटे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ईडीकडून कोणती पावले उचलली जातील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मिर्चीच्या व्यवसायातून गुन्हेगारी जगतात आलेला इक्बाल मेमन हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळच्या सहकाऱ्यापैकी एक होता. इक्बाल मिर्चीचा हृदयविकाराच्या झटक्याने २०१३ मध्ये मृत्यू झाला होता. मृत्यूच्या ९ वर्षानंतरही मिर्चीची चर्चा सुरू असते. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात ईडीने मिर्चीविरोधात आरोपपत्र दाखल केले. अंमली पदार्थाची तस्करी करायचा. त्यानंतर दाऊदसाठी त्याने तस्करीचे काम सुरू केले असल्याचे म्हटले जाते. इक्बाल मिर्ची १९९७ च्या सुमारास दुबईत पळून गेला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button