Top Newsराजकारण

गडकरींकडे जबाबदारी दिली असती तर…? सुब्रमण्यम स्वामींचा कोरोनावरून पुन्हा मोदींवर निशाणा

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात पंतप्रधान कार्यालय अपयशी ठरले आहेत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून न राहता मोदींनी आपले सहकारी नितीन गडकरी यांच्याकडे जबाबदारी द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी यापूर्वी केली होती. त्याच मुद्द्यावरुन स्वामींनी पुन्हा एकदा केंद्र सरकावर टीका केलीय.

देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. अशावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा घरचा आहेर दिलाय. नितीन गडकरी यांच्याबाबत मी दिलेला प्रस्ताव स्वीकारला गेला असता तर चांगलं झालं असतं, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणालेत. देशातील कोरोनाचं संकट अधिक बिकट होत चाललं आहे. त्यासाठी मी प्रस्ताव दिला होता की कोरोना विरोधातील लढाईची कमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हाती द्यावी. जर हा प्रस्ताव स्वीकारला गेला असता तर देशातील कोरोना स्थिती नियंत्रणात असती. मात्र आता देशातील कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने एक समिती बनवली आहे. सॉलिसिटर जनरल कोर्टाला शरण गेले आहेत. आधी गृह मंत्रालय आदेश देत होतं. आता सरकारला सर्वोच्च न्यायालयाचं ऐकावं लागलं. लोकशाही देशात ही एकप्रकारे सरकारची हार आहे. अशा शब्दात स्वामी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलंय.

भारताने मुस्लीम आक्रमक आणि ब्रिटीश साम्राज्यशाहीचे संकट ज्याप्रमाणे परतावून लावले तसेच कोरोनाच्या संकटानंतरही भारत तग धरून राहील. नियमांचे पालन न केल्यास भारताला कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवीत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहणे, हे निरुपयोगी ठरेल, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button