ज्ञानदेव वानखेडेंच्या आरोपांवर म्हणणे सादर करा; कोर्टाचे नवाब मलिकांना आदेश

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच मलिक रोज सोशल मीडियावरून टार्गेट करत असल्याचं सांगत त्यांना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून मनाई करण्याचे आदेश देण्याची विनंतीही वानखेडे यांच्या वकिलाने केली आहे. तर वानखेडे यांच्या आरोपावर उद्याच उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने आज मलिक यांच्या वकिलांना दिले आहेत.
ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर आज न्यायामूर्ती एम. जे. जमादार यांच्याकडे सुनावणी झाली. सुनावणी सुरू होता आजकाल प्रसारमाध्यमांमध्ये आणि वर्तमानपत्रात नवाब मलिक आणि समीर वानखेडेंच्या बातम्या दरदिवशी येत आहेत, असं न्यायामूर्ती जमादार म्हणाले. त्यावर ज्ञानेश्वर वानखेडे यांचे वकील अशरफ शेख यांनी वानखेडे यांची बाजू मांडली. नवाब मलिक हे ज्ञानेश्वर वानखडे आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत जवळपास दररोज काहीतरी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत, असा युक्तिवाद अशरफ शेख यांनी केला.
शेख यांच्या या युक्तिवादानंतर प्रतिवादींनी यावर काही रिप्लाय फाईल केला आहे का? असा सवाल कोर्टाने केला. त्यावर मलिक यांचे वकील अतुल दामले यांनी मलिक यांची बाजू मांडली. आम्हाला एक दिवस आधीच याबाबतची नोटीस मिळाली आहे. आम्ही आमचे उत्तर १५ दिवसाने दाखल करू. आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती दामले यांनी केली.
जोपर्यंत रिप्लाय फाईल होत नाही, तोपर्यंत मलिक यांनी सोशल मीडियावर काहीही पोस्ट करू नये. आजच मलिक यांनी क्रांती रेडकर यांच्या बहिणीबाबत एक पोस्ट केली आहे, असं शेख यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. तर या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी ठेवण्याची विनंती दामले यांनी केली. मात्र, याबाबत उद्याच रिप्लाय दाखल करा असं सांगत कोर्टाने याप्रकरणी १० नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली. दरम्यान, सोशल मीडियावर मलिक यांना पोस्ट करण्याबाबतचे कोणतेही निर्बंध कोर्टाने लावलेले नाहीत.