विविध खात्यांमधील ‘वाझे’ आधी शोधा; भाजपचा नवीन गृहमंत्र्यांना सल्ला

मुंबई: राजकीय निष्ठा बाळगून काम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांची माहिती घेणार असल्याचं वक्तव्य नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केलं आहे. वळसे-पाटलांच्या या विधानावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. ‘वळसे-पाटील यांनी गृह खात्यातील संघनिष्ठ अधिकारी शोधण्याचे जाहीर केलंय. खरंतर, संघ देश प्रेम शिकवतो. त्यामुळं वळसे-पाटील यांनी संघनिष्ठ अधिकारी शोधण्यात वेळ घालविण्यापेक्षा विविध खात्यांत भ्रष्ट व्यवहार करणारे जे ‘वाझे’ अद्याप दडलेले आहेत त्यांना शोधून काढावं, ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे, असा सल्ला उपाध्ये यांनी दिला आहे.
सचिन वाझे प्रकरणानंतर बदली करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसनं हे आरोप फेटाळले होते. परमबीर हे भाजपनं लिहून दिल्यानुसार आरोप करत असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलं होतं. पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या निष्ठेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. रश्मी शुक्ला यांच्यासारखे काही अधिकारी भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी वळसे-पाटील यांची गृहमंत्रिपदी निवड करण्यात आली.
वळसे-पाटील यांनी गृहखात्याच्या कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांना राजकीय निष्ठा बाळगून असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल विचारण्यात आलं होतं. पोलीस दलातील काही अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याची चर्चा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं होतं. त्यावर, ‘कुणाची निष्ठा काय आहे हे लवकरच तपासून पाहिलं जाईल,’ असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.