मुंबई : लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मुंबईसह राज्यात अनेक भागात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला काही ठिकाणी कडकडीत, तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचा दावा केलाय.
आज महाविकास आघाडीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जनतेनं प्रतिसाद दिला. भाजपनं बंदला विरोध केला. भाजप शेतकऱ्यांच्या हत्तेचं समर्थन करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा बंदला विरोध पाहता त्यांची भूमिका स्पष्ट होते. भाजप नेते रस्त्यावर आले नाहीत म्हणून त्यांना बंद कळाला नसेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
मागील वर्षी नैसर्गिक आपत्ती झाली. त्याची पाहणी करायला केंद्राची टीम आता आली आहे. मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या भागाला मदत करण्याची सरकारची भूमिका आहे, असंही पटोले यावेळी म्हणाले. महाराष्ट्र बंदसाठी जबरदस्ती झाली असेल तर त्याचं समर्थन काँग्रेस करत नाही. ज्या कुणी जाळपोळ आणि बसची तोडफोड केली त्याचं आम्ही समर्थन करत नाही. ज्या कुणी जाळपोळ आणि बसेसची तोडफोड केली, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. हा सरकारचा बंद नव्हता तर पक्षीय बंद होता, असं पटोले म्हणाले.
अमृता फडणवीसांच्या टीकेला उत्तर
दरम्यान, महाराष्ट्र बंदवरुन महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनाही नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. वसुलीची जाणीव अमृता फडणवीस यांना अधिक असेल. त्या माझ्या सुनेप्रमाणे आहेत, अशा शब्दात पटोले यांनी अमृता फडणवीसांना टोला लगावला आहे.
लखीमपूर खेरी घटनेला भाजपचे अप्रत्यक्ष समर्थन; जयंत पाटलांचा संताप
लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या घटनेविरोधातील ‘महाराष्ट्र बंद’ला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. “लखीमपूर हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा घराघरातून महाराष्ट्रातून निषेध होईल. या बंदला विरोध करणे म्हणजे भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेला अप्रत्यक्ष समर्थन आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. मुंबईतील ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनामध्ये सहभागी झाले असताना ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीतील तिनही पक्ष आणि मित्र पक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. या बंदचं कारण म्हणजे भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्य़ांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. यात भाजपा त्यांचे राजकीय मत आग्रहाने मांडतय हे समजू शकतो. पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे. भाजपाच्या मंत्र्यांच्या चिरंजीवांनी हे हत्याकांड केलंय. अद्यापही त्याला अटक होत नाही. त्याला सन्मानाने बोलावले जाते, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
भाजपला शेतकऱ्य़ांचे आंदोलन चिरडण्याचे काम करायचं आहे. त्याचा निषेध म्हणून मविआच्या सर्वच पक्षांनी हा बंद पुकारला आहे. परंतु लखीमपूर हत्याकांडाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल. असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. भाजपा महाराष्ट्र बंदला विरोध दर्शवत लखीमपूरमधील शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेला अप्रत्यक्षपणे समर्थन देत आहे. मात्र भाजपाच्या शेतकरीविरोधी भूमिकेला सर्वच स्तरातून विरोध होताना दिसतोय. आजचा बंद कुणावरही लादण्यात आलेला नाही. बहुतेक ठिकाणी लोकच यात सहभागी होतायत, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
लखीमपूरमधील घटना सरकारी दहशतवाद नव्हता का? राजू शेट्टी यांचा फडणवीसांना सवाल
लखीमपुर-खिरी या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र या बंदला विरोध करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा बंद सरकारी दहशतवाद असल्याची टीका महाविकास आघाडी सरकारवर केली आणि याच टीकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उत्तर देत लखीमपूर या ठिकाणी झालेली घटना ही सरकारी दहशतवाद नव्हता का असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे तर महाविकास आघाडी सरकारचे आणि आमचे काही मतभेद असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी हा बंद मह विकास आघाडी सरकारने पुकारला त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे असे देखील राजू शेट्टी म्हणाले
केंद्रातले ६० टक्के मंत्री डागाळलेले, म्हणूनच मौनव्रत आंदोलन : पटोले
काँग्रेस सरकार हे गांधी विचारांचे सरकार आहे. त्यामुळे केंद्रात बसलेल्या सरकारपर्यंत आता गांधी विचार पोहचवण्याची वेळ आली आहे. ज्या केंद्र सरकारमध्ये खूनी, स्मगलर आणि तडीपार लोक बसले आहेत, ते देशाला संपवायला निघाले आहेत. त्यामुळे अशा केंद्रातील लोकांना गांधी विचारांची सध्या गरज आहे, असे मत महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. राजभवनाबाहेर कॉंग्रेसकडून आज मौनव्रत आंदोलन करण्यात आले. गांधी विचार त्यांच्यापर्यंत पोहचवून त्याची जाणीव करून द्यायची आहे. केंद्रात मोठ्या प्रमाणात जे ६० टक्के दोषी मंत्री आहेत, मिश्रा हे एकमेव मंत्री नाहीत, अशा सगळ्या डागाळलेल्या मंत्र्यांना पदावरून काढले पाहिजे, तेव्हाच देश सुरक्षित राहू शकतो. शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना चिरडायची भाजपची भूमिका आहे. त्यामुळे मौनव्रताच्या माध्यमातून संदेश देण्याचे काम आम्ही केले आहे. केंद्रातील भाजपचे सरकार या आंदोलनानंतर तरी जागे होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कॉंग्रेसकडून यावेळी राजभवनात एक निवेदनही देण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागात दौरे करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून दुजाभाव होत आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नाना पटोले म्हणाले. केंद्राने फक्त नाममात्र पैसे देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे फडणवीसांनी केंद्र सरकारमध्ये जाऊन राज्यातील सरकारला मदत करण्याची गरज आहे. यातूनच फडणवीस यांचा ढोंगीपणा सरकारला दिसतो आहे.
मावळच्या घटनेचाही कॉंग्रेसनेही मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. या घटनेनंतर राहुल गांधी हे स्वतः त्याठिकाणी आले होते. आमच्या पोटात वेगळं आणि ओठात वेगळं अशी भूमिका नाही. आमच्या नेत्या प्रियंका गांधी किडनॅप केले, त्यामुळे केंद्राची महिलांसाठीची भूमिका दिसत आहे. महिलांचा, शेतकऱ्यांचा, छोट्या व्यापाऱ्यांचा विरोध करणारे आणि संपवणारे, असे हे सरकार आहे. या आंदोलनात शेतकरी, व्यापारी संबंध वर्गाने सहभाग दाखवत हे महाराष्ट्र बंद आंदोलन यशस्वी केल्याचेही ते म्हणाले.