Top Newsआरोग्यराजकारण

आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध; नवीन नियमावली जाहीर

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, वडेट्टीवारांचा इशारा

मुंबई : राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून ३१ डिसेंबरच्या म्हणजे आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू होणार आहे.

राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्यांना फक्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. पर्यटनस्थळावर कलम १४४ लागू होणार आहे. तसेच परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

राज्यात गुरुवारी १९८ नव्या ऑमिक्रॉनबाधितांची नोंद झाली. चिंतेची बाब म्हणजे यातील १९० रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर ४ रुग्ण हे ठाण्यातील आहे. राज्यात एकूण ऑमिक्रॉनबाधितांची संख्या ४५०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२५ रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. तसेच राज्यात गुरुवारी ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि २२ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होत गेली तर राज्यात आणखीन कडक निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य सरकारची नवीन नियमावली

– लग्न सोहळा बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मैदानात असो फक्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम किंवा मेळाव्या देखील बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मैदानात असो जास्तीत जास्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– राज्याच्या कोणत्याही भागात जे पर्यटन स्थळे किंवा समुद्रकिनारे, मोकळी मैदाने जिथे गर्दी होण्याची शक्यता आहे तिथे स्थानिक प्रशासनाला १४४ लागू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
– आधीच अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचनाही लागू राहतील

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, वडेट्टीवारांचा इशारा

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात सध्या लॅाकडाऊनची स्थिती येत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढलाय. तिसरी लाट आली आहे. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. रुग्णवाढ पाहिली तर लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही.

राज्यात कोरोना तसेच कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून सभा, समारंभ, तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत पार्टी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारादेखील राज्य सरकार तसेच प्रशासनाने दिलाय. असे असतानादेखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. याच कारणामुळे वडेट्टीवार यांनी कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले. तसेच लॉकडाऊनची वेळ आलीच तर ट्रेन, लोकल आणि इतर सुविधांवर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारादेखील त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button