Top Newsआरोग्य

राज्यात जिल्हा पातळीवर पुन्हा कडक लॉकडाऊन; नाशिक शहरात १० दिवस संपूर्ण टाळेबंदी

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. अशावेळी आता जिल्हा पातळीवर लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. आज नाशिक, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, वाशिम, सातारा, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात येत आहे.

नाशिक शहरात १२ मे म्हणजे बुधवारपासून पूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ तारखेला दुपारी १२ ते २२ तारखेच्या दुपारी १२ असे १० दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात रुग्णालये आणि औषधी दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकानं या काळात बंद राहणार आहे. औद्योगिक वसाहती देखील केवळ इन हाऊस सुरू राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला,दूध,किराणा दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेडिकल कारण वगळता इतर कोणतेही कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल पंपावर देखील केवळ अत्यावश्यक वाहनांना इंधन मिळणार आहे. भाजीपाला आणि किराणा दुकानं १० दिवस बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी नाशिकरांना २ दिवसांची मुभा देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्यांना पास बंधनकारक असणार आहे.

सोलापूर : सोलापूर शहर जिल्ह्यात रविवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. हा लॉकडाऊन १५ मे पर्यंत असणार आहे. या काळात भाजीपाला, किराणा दुकाने, चिकन, मटण, अंड्याची दुकानं पूर्णत: बंद राहतील. त्याचबरोबर मार्केट हाऊस, रिसॉर्ट, लॉजही बंद राहणार आहेत. किराणा दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ या वेळेत घरपोच सेवा देण्याच मुभा देण्यात आलीय. तसंच सकाळी ६ ते ९ या वेळेत दूध विक्रेत्यांना घरपोच दूध देता येणार आहे.

सातारा : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातारा जिल्हा सातव्या क्रमांकावर तर मृत्यूदराच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. सातारा जिल्ह्यात सध्या २० हजार ४४८ कोरोना रुग्ण आहेत. तर आतापर्यंत २ हजार ८२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्याचं मोठं आव्हान सध्या आरोग्य यंत्रणेसमोर उभं आहे. अशा स्थितीत सातारा जिल्ह्यात रविवारपासून लॉकडाऊन अजून ५ दिवस वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन आता 15 मे पर्यंत करण्यात आलाय. तशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलीय.

कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी काही गंभीर बाबी दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे २ दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. कोल्हापुरात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढतेय. तसंच तरुण मुलांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे १० ते १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल असे संकेत मुश्रीफ यांनी दिले आहेत.

अमरावती : अमरावती जिल्ह्यात रविवारपासून १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी केलीय. या काळात फक्त रुग्णालये आणि औषधी दुकाने सुरु राहणार आहेत. त्यामुळे आता कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात दारुच्या दुकानांसमोर मोठी गर्दी होत असल्यामुळे आता दारुची दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातही रविवारपासून १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक बाबी सुरु राहणार आहेत. ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकाने सुरु ठेवल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय.

वर्धा : वर्धा जिल्ह्यात ८ मे ते १३ मे दरम्यान कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत होती. त्याचा परिणाम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने वाढत होता. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ५ दिवस कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी देण्यात आलीय. तसंच कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

वाशिम : वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रविवारपासून ते १५ मे पर्यंत ६ दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज या लॉकडाऊनचा दुसरा दिवस आहे. वाशिम शहरातील मुख्य रस्त्यावर आणि चौकात शुकशुकाट दिसून आला. तसंच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं पूर्णतः बंद ठेवली आहेत. या लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे. तसंच दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला, फळ आणि दूध घरपोच सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत मुभा देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button