पुणे : शिक्षण क्षेत्रात वेगाने घडत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अध्यापकांनी नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असून अध्यापकांना त्यासाठी आवश्यक नवा दृष्टीकोन देण्यास महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी जी पदवी घेतली त्यावरच अवलंबून राहू नये. शरद पवार यांना मी खूप जवळून पाहतो. ते आजही तरुण पिढीसोबत चालण्याचे प्रयत्न करतात, असे म्हणत शरद पवारांप्रमाणे अपडेट राहण्याचेच अजित पवार म्हणाले.
पवार म्हणाले, आजचा विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडला गेला आहे. तो अभियांत्रिकी, वैद्यकीय, चित्रपट, नाटक, कला, संस्कृती, नवे शोध आदी क्षेत्राबाबत अधिक जागरूक आहे. शिक्षक आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्यासाठी नवा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे. अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून नव्या युगातील आधुनिक ज्ञान आणि प्राध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणे शक्य होईल. चांगले शिक्षक घडविण्यासाठी ही संस्था उपयुक्त ठरेल.
देशाला गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा समृद्ध करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ गुरुजनांनी शिक्षणांची गंगा शेतकरी, कष्टकरी बहुजन समाजाच्या घरापर्यंत नेण्याचे काम केले, महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. ध्येयनिष्ठ शिक्षणसेवेची परंपरा आजचे शिक्षकही पुढे नेत आहेत.
माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना नवा वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे कार्य केले. जयंत नारळीकर, जि.प.शाळेचे शिक्षक रणजित सिंह डिसले यांच्यासारख्या अनेक शिक्षकांचे कार्य मौलिक आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता अध्यापकांनी ही परंपरा पुढे नेण्यासाठी एका विषयापुरते मर्यादीत न रहाता ज्ञानकक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानासोबत नव्या संकल्पना मांडण्यासाठी आणि जगातील इतर भाषा, संस्कृती शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.