
मुंबई: टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीकडून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. तुम्ही राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी असल्याचा खोचक टोलाही यावेळी लगावण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की, मला संपूर्ण देशवासीयांकडून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. खेलरत्न पुरस्कार यापुढे मेजर ध्यानचंद पुरस्कारने ओळखला जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
"जनतेची मागणी" म्हणून खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं म्हणे… चांगलं आहे.
जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत
१- महागाई कमी करा
२- युवकांना रोजगार द्या
३- महिलांना सुरक्षा द्या
४- शेतकऱ्यांना सन्मान द्या
५- राजीनामा द्या— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 6, 2021
जनतेची मागणी होती म्हणून नरेंद्र मोदींनी खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदलले, हे चांगलं आहे पण जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि राजीनामा द्या, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये, आधीच्या सरकारने केलेल्या कामांची नावे फक्त राजकीय द्वेषातून बदलून त्याचे श्रेय लाटण्याची या सरकारची जुनी खोड आहे. तापलेल्या तव्यावर स्वतःची चपाती भाजण्याची सवय भाजपाने आता तरी बदलायला हवी. जनतेच्या आणखीही बऱ्याच मागण्या आहेत त्याकडे देखील प्रधान’सेवकांनी’ लक्ष द्यावे, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.




