मुंबई : राज्यातील कोरोनाच्या संसर्गाचे संकट कमी होत स्पष्ट करत राज्य सरकारने १ डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगानेच राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात कोविड -१९ या आजाराची दुसरी लाट मावळताना राज्यातील सामाजिक संस्था, आस्थापना कामकाज सुरू करत असल्याचेही सरकारने म्हटले आहे. राज्यातील प्राथमिक शाळा सुरू असताना सर्वसाधारण सूचना तसेच विशेष प्रसंगी मार्गदर्शक सूचनांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने या सूचना जाहीर केल्या आहेत.
१) दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवणे
२) प्रत्येकाने फेस मास्क / फेस कव्हर वापरणे बंधनकारक आहे.
३) वारंवार हात धुणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी व इतर संबंधितांना हात कसा धूवावा यासाठीचे प्रशिक्षण घेण्यात यावे.
४) शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून गेण्यात यावे
५) शिंकताना, खोकताना स्वतःचे नाव हात रूमाल वापरून झाकावे
६) बारकाईने आपल्या आरोग्याचे निरीक्षण स्वतः करावे तसेच कोणतीही आजार किंवा लक्षणे असल्याचे सांगावे
शाळा उघडण्यापूर्वी नियोजन
शाळा उघडण्यापूर्वी नियोजनासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कंटेन्टमेंट झोनमधील शाळा उघडू नये असे आदेश आहेत. तसेच जे विद्यार्थी, शिक्षक कन्टेन्मेंट झोनमध्ये राहतात त्यांना शाळेत यायची अनुमती देऊ नये. विद्यार्थी, शिक्षक पालक यांनी कन्टेन्मेंट क्षेत्राला भेट देऊ नये. पुर्ण शाळेची स्वच्छता करावी तसेच वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग पुसून काढावेत अशाही सूचना आहेत.
ज्या शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात आल्या आहेत, अशा शाळांची स्वच्छता विशेष लक्ष पूर्वक करण्यात यावी. बायोमेट्रिक उपस्थिती टाळण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षक आणि विद्यार्थी संख्या लक्षात घेता शाळेत मुबलक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. मैदानावर, प्रार्थनास्थळी शारिरीक अंतर पाळावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळा सुरू झाल्यावर घ्यायची काळजी
१) ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशा व्यक्तींनाच शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्याची परवागनी द्यावी
२) कोविड १९ प्रतिबंध संदर्भातील शिक्षण साहित्य लावावे
३) स्कुल बस किंवा ज्या वाहनाने मुले शाळेत येतात त्यामध्ये गर्दी नसावी
आरोग्य शिक्षण, मानसिक आरोग्याच्या काळजी घेण्याच्या अनुषंगानेही सुचना देण्यात आल्या आहेत. शाळेत येताना किंवा शाळा सुटताना मुलांनी एकत्र येऊन कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये. आजारी असणाऱ्या मुलांना किंवा शिक्षकांना शाळेत येऊ नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता आवश्यकतेनुसार मनासिक समुपदेशन व्यवस्था करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोव्हीड १९ सदृश्य लक्षणे निर्माण झाल्यास किंवा कोविड बाधित विद्यार्थी आढळल्यास कृतीयोजनाही स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार शाळेच्या व्यवस्थापनाने व्यवस्था करणे अपेक्षित आहे. तसेच अशा व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची यादी करणेही अपेक्षित आहे. एकुण १२ सूचना शाळांसाठी तसेच पालकांसाठी आरोग्य सेवा विभागाच्या संचालक डॉ अर्चना पाटील यांनी जाहीर केल्या आहेत.