नवाब मलिकांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आज माझगाव न्यायालयात सुनावणी पार पडली आणि नवाब मलिक यांचा १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर माझगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिवाय मलिक यांना ५ हजार रुपये अनामत जमा करण्याचे आदेश देखील दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३० डिसेंबरला होणार आहे.
नवाब मलिक यांच्या विरोधात मोहित भारतीय यांनी मानहानीचा खटला दाखल करून १०० कोटींचा दावा केला होता. याप्रकरणी माझगाव न्यायालयाने गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे आज सोमवारी याप्रकरणाची सुनावणी माझगाव न्यायालयात पार पडली आणि आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ३० डिसेंबरला होणार आहे.
दरम्यान ३ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झालेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणासंदर्भात नवाब मलिक सातत्याने अनेक खुलासे करताना दिसले. त्यादरम्यान मलिकांनी आर्यन खानला अटक नाही तर त्यांचे अपहरण करून खंडणी मागण्यात आली आणि या कटकारस्थानाचा मुख्य सुत्रधार मोहित भारतीय असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याप्रकरणी मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.




